घरमहाराष्ट्रMumbai Metro : पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज, प्रवाशांच्या सेवेसाठी मान्सून कंट्रोल रूम

Mumbai Metro : पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज, प्रवाशांच्या सेवेसाठी मान्सून कंट्रोल रूम

Subscribe

मुंबई : कोसळणाऱ्या पावसात अनेकदा मुंबईची तुंबई होते. अशा परिस्थितीत या महानगराची जीवनवाहिनी समजणारी लोकलसेवा ठप्प किंवा विस्कळीत होते. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात प्रवाशांना विनाव्यत्यय प्रवास करता यावा, यादृष्टीने महामुंबई मेट्रोने (Mumbai Metro) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चारकोप मेट्रो डेपोमध्ये मान्सून कंट्रोल रूम तयार करण्यात आला असून तो 24 तास कार्यरत असेल.

प्रवाशांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे कंट्रोल रूम असून प्रशिक्षित कर्मचारी येथे कार्यरत असतील. बदलत्या वातावरणामुळे उद्भवणारी अनपेक्षित परिस्थिती तसेच प्रवासादरम्यानचा व्यत्यय तत्काळ सोडवण्यास हे कर्मचारी मदत करतील. 1800 889 0505 / 1800 889 0808 या टोल फ्री क्रमांकावरून आपत्कालीन परिस्थितीत कंट्रोल रूमशी संपर्क साधता येईल.

- Advertisement -

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन, बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र (BMC), पोलीस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशमन दलासोबत मुंबई मेट्रोच्या मान्सून कंट्रोल रूमचा हॉटलाइन क्रमांक थेट जोडलेला आहे. ज्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या यंत्रणांशी तत्काळ समन्वय साधून समस्येचे तत्काळ निरसन करता येईल.

ॲनिमोमीटर यंत्र व सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज
मेट्रो मार्ग 2अ आणि 7च्या प्रत्येकी पाच अशा एकूण 10 स्थानकांवर वाऱ्याची गती व दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेतला जाईल. ज्यामुळे मुंबई मेट्रोला वाऱ्याच्या स्थितीचे अवलोकन करून मेट्रोची सेवा विनाव्यत्यत कार्यान्वित ठेवणे सुरक्षित आहे की नाही, हे ठरवता येईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेत दक्षता राखण्यासाठी महामुंबई मेट्रोने प्रत्येक मेट्रो स्थानकांवर किमान 64 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, ज्यात प्लॅटफॉर्म, रस्त्यालगत असलेला भाग याचा समावेश आहे. या कॅमेरांचे मॉनिटरिंग 24 तास कार्यान्वयन नियंत्रण केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे केले जाणार आहेत.

- Advertisement -

…तर महामुंबई मेट्रोकडून अतिरिक्त मेट्रोसेवा
महामुंबई मेट्रो मुंबईकर नागरिकांना विनाव्यत्यय तसेच सुरक्षित प्रवास सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध आहे. मान्सून कंट्रोल रूम ही आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी सज्ज आहे. ही टीम पावसाळ्यातील वातावरणीय बदल आणि मेट्रोची सेवा यांचे निरीक्षण करून नागरिकांचा प्रवास विनव्यत्यय आणि सुरक्षितता निश्चित करण्याची जबाबदारी पार पडतील. तसेच या काळात इतर सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेमध्ये व्यत्यय आल्यास, महामुंबई मेट्रोकडून गरजेनुसार अतिरिक्त मेट्रोसेवा चालवण्याची तयारी करण्यात आलेली आहे. प्रवाशांना एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक सुविधा प्रदान करणे हे महामुंबई मेट्रोचे उद्दिष्ट असल्याचे महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -