घरमहाराष्ट्रराणेंनी केला शिवसेनेचा गेम भेजबळांचा राष्ट्रवादीवर नेम

राणेंनी केला शिवसेनेचा गेम भेजबळांचा राष्ट्रवादीवर नेम

Subscribe

तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपला पहिलाच हिसका स्वपक्षाला दाखवला. भुजबळांनी विधान परिषदेच्या नाशिक निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराला पाडून शिवसेनेला मदत केली. शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांची मदत झाल्याचे सांगत त्याला दुजोरा दिला. तर मताचे गणित पूर्णपणे विरोधात असूनही शिवसेना उमेदवार विजयी झाल्याने या ‘गेम’ला पुष्टी मिळाली आले.
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा याआधी राष्ट्रवादीकडे होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना काँग्रेससोबत भाजपनेही पाठिंबा दिला होता. असे असताना सेनेचे दराडे हे ६४४ पैकी ३९९ मते मिळवून विजयी झाले. खरेतर, नाशिकमध्ये शिवसेनेकडे केवळ २२१ मते होती. विजयासाठी त्यांना बरीच मते बाहेरून खेचावी लागणार होती. काँग्रेस, भाजपने आधीच राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने ते शक्य नव्हते. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र, इथे उलटे घडले. सेनेने राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव केला. सेनेविरोधात राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या भाजपचाही मुखभंग झाला. छगन भुजबळांच्या गटाने सेनेला मदत केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर येताच बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळांना तुरुंगात जावे लागले. या काळात राष्ट्रवादीने त्यांची पुरेशी पाठराखण केली नसल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. त्यातूनच नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलली. भुजबळांना जामीन मंजूर मिळताच त्यांचे पुत्र पंकज यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीतच या निवडणुकीची रणनीती ठरली असावी, असे आता बोलले जात आहे. भुजबळ यांच्यामुळेच मी आमदार झालो, अशी प्रतिक्रिया विजयानंतर दराडे यांनी दिली. त्यामुळे ‘राष्ट्रवादीचा गेम’ प्रकरणाला एकप्रकारे पुरावाच मिळाला. भुजबळांनी या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा हिशेब चुकता केल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये समोरच्या बाजूने धनशक्तीचा वापर मोठ्याप्रमाणात करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे. कोण कुणाची भेट घेतल्याने यावर मतदान कसे होते, यावर अवलंबून नसते आणि छगन भुजबळ साहेबांनी मदत करण्याचा प्रश्नच नाही आणि विशेष म्हणजे भाजपने आम्हाला मतदान करण्याचाही प्रश्न येत नाही. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये तुलनात्मकदृष्टया आकडेवारी कमी होती. तरीही आमच्या उमेदवाराने लढत चांगली दिली आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील

- Advertisement -

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करून छगन भुजबळांनी शिवसेनेला मदत केली असताना कोकणात स्वाभिमान संघटनेचे संस्थापक नारायण राणे जायंट किलर ठरले. त्यांनी शिवसेनेचा गेम करत राष्ट्रवादीला मदत केली. राणेंच्या रणनीतीमुळे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनितेक तटकरे विजयी झाले आहेत.
विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात तटकरे विजयी झाले. एकूण ९३८ मतांपैकी ६२० मते राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांना तर ३०६ मते शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांना मिळाली. १२ मते बाद झाली. ३१४ मतांच्या आघाडीने तटकरे यांनी राष्ट्रवादीची ही जागा कायम राखली.
विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली होती. काँग्रेस, स्वाभिमान आणि शेकाप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. कागदावर युतीची मते अधिक होती. मात्र नारायण राणेंनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाडणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी त्यासाठी भाजपची यशस्वी मनधरणी केल्याचेही सांगितले जाते.
त्यातच पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपासमोर उमेदवार उभा केल्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. त्यात नारायण राणेंनी सेनेला अडकवण्यासाठी जाळे टाकले होते. भाजपच्या नाराजीचा फायदा घेत राणेंनी सेनेला अस्मान दाखवले.
या निवडणुकीत शिवसेनेची मते कायम राहिली असून, उर्वरित सर्वच मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याचे चित्र दिसत आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ३०३ मते होती तर भाजपची १६४ मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना उमेदवार साबळे यांना ३०६ मतेच मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्वत:ची मते १७४ इतकीच आहेत. उर्वरित ४४६ मते त्यांना इतरांच्या पाठिंब्यामुळे मिळाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -