नाशकात ५३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Complaints about Ajmer Saundane Kovid Center
Complaints about Ajmer Saundane Kovid Center

नाशिक जिल्हा प्रशासनास बुधवारी (दि.२७) दिवसभरात ५३ रुग्ण करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ३ रेल्वे पोलीस, ६ पोलीस कर्मचारी आहेत. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पंचवटी परिसरातील क्रांतीनगर,रामनगर व सरस्वतीनगर या भागातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. या परिसरात औषध फवारणीसह सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छता ठेवावी, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण १ हजार ५४ रुग्ण बाधित आहेत. यामध्ये नाशिक शहरात १३५ व मालेगावत ७१५ रुग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनास सकाळी पहिल्या टप्प्यात १० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये वरचे टेंभे (ता.बागलाण) २, अजमेर सौदाणे (ता.बागलाण)२, सिन्नर ३, संगमनेर १, नंदुरबार १ आणि पंचवटील एका २५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात मालेगावातील ११४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २५ रुग्ण पॉझिटिव्ह असून रुग्णांमध्ये तीन रेल्वे पोलीस व सहा पोलीस कर्मचारी आहेत. तिसर्‍या ९२ रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये १७ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पंचवटी ३, नाशिकरोड २, दापूर (ता.सिन्नर)५, संगमनेर १, येवला येथील ६ बाधित रुग्ण आहेत.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत १० हजार ६२४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १०५४ रुग्ण पॉझिटिव्ह व ९ हजार १२५ जण निगेटिव्ह आहेत. १ हजार ५४ पैकी ७३९ रुग्ण बरे झाले असून ६० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ४४६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक शहर १६४, नाशिक ग्रामीण ३६ आणि मालेगाव शहरातील २४६ संशयित रुग्ण आहेत. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ११२ संशयित रुग्ण उपचारार्थ दाखल झाले. यामध्ये नाशिक महापालिका रुग्णालये ८५, जिल्हा रुग्णालय ३, मालेगाव रुग्णालय २० आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात ४ जण दाखल झाले आहेत.

दुकानदार, विक्रेत्यांना उपाययोजनेबाबत सूचना
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीतील सर्व जीवनाश्यक वस्तूंची नियमानुसार विक्री करताना अनावश्यक गर्दी होणार नाही. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असावे, यासाठी आखणी व्यवस्था व सुरक्षिततेची आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना नाशिक महापालिकेतर्फे दुकानदार, विक्रेते व आस्थापनाचालकांना करण्यात आल्या आहेत.

शहरात एक इमारत प्रतिबंधित क्षेत्र, दोन परिसर निर्बंधमुक्त
नाशिक शहरातील श्रीहरी अपार्टमेंट, काठेगल्ली आणि कासलीवाल रुग्णालय परिसरात १४ दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे श्रीहरी अपार्टमेंट व कासलीवाल रुग्णालय परिसर निर्बंधमुक्त करण्यात आले आहे. सरस्वतीनगर, बलरामनगर येथील साई विश्वास इमारतीमध्ये बाधित रुग्ण आढळून आला आहे. खबरदारी म्हणून महापालिकेने साई विश्वास इमारत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण 105४
नाशिक शहर -1३५ (मृत 8)
नाशिक ग्रामीण -1५६ (मृत ३)
मालेगाव शहर -७१५ (मृत ४७)
अन्य —4८ (मृत २)