घरमहाराष्ट्रनाशिकरिमझिम सरींवर हरणांसह मोरांचे मनमोहक नृत्य

रिमझिम सरींवर हरणांसह मोरांचे मनमोहक नृत्य

Subscribe

दीपक उगले । ममदापूर

यावर्षी मान्सूनचा पाऊस जवळपास एक-दीड महिने उशिराने रिमझीम पाऊस पडतोय. शेतकर्‍यांसोबत पशू-पक्षी पवसाची आतुरतेने वाट बघत होते. रिमझिम पावसानं पशु-पक्षी आनंदाने नाचू गाऊ अन् बागडू लागली आहे. ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, रेंडाळे, कोळगाव, रहाडी सह परिसरात रिमझिम पाऊस पाऊस होत आहे. परंतु मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. रिमझीम पावसाच्या सरींवर ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रा सह शेत शिवारात मोर आनंदाने नाचू गाऊ लागली आहे. हरीण, काळवीटांना खाण्यासाठी गवत हिरवे झाले आहे. त्यामुळे अरण्यात हरीण, काळवीट स्वच्छंद उड्या मारताना दिसत आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर या परिसरात पावसाळ्यात आनंदाने नाचणारा मोर बघणे म्हणजे विलक्षण बाब असते. येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात पावसाळ्यात शांत वातावरण व जैवविविधतेमुळे इथे पूर्वीपासूनच मोर वास्तव्यास आहेत.राष्ट्रीय पक्षी असलेला हा देखणा मोर या परिसरातील वैभव आहे.

ऐन पावसाळ्यात येवल्याच्या पूर्वेला ममदापुर वन संवर्धन क्षेत्राकडे येणं म्हणजे दुग्धशर्करायोगच! असतो दुग्धशर्करायोग म्हटलं कारण, मेघराजाच्या वर्षावाने न्हाऊन निघालेली धरती, वातावरणातला सळसळणारा उत्साह, ताजी हवा आणि या अशा मोसमात हिरव्यागार माळरानावर डौलाने ठेका धरणारे मोर! याचि देही, याचि डोळा पाहावा हा सोहळा! हे दुर्मिळ दृश्य पाहताना ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच… हे बोल मुखात आले नाहीत तर नवल ! परंतु पावसानं विलंब केल्याने सर्व जण या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. ममदापूरसह परिसरातील हे ‘मयूरवैभव’ सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

- Advertisement -

ममदापूर सह परिसरात असंख्य मोर आढळतात. त्यामुळे सतत त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो. जर आवाजाचा लक्षपूर्वक कानोसा घेतला तर मोर कुठे आहेत ते कळतं. शेतात फिरताना या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतात. मोराबरोबरच मोठ्या संख्येने लांडोरीही पाहायला मिळतात. शेतात एकाच ठिकाणी अनेक लांडोरी पाहायला मिळाल्या की समजायचं मोर जवळपासच आहे. याव्यतिरिक्त एकत्र उडणारे मोर-लांडोर, नाचणारे मोर-लांडोर, पिसं स्वच्छ करणारे मोर, झाडाच्या शेंड्यावर बसलेले मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयक्रीडा करणारे मोर-लांडोर अशा मोरांच्या अनेक दुर्मीळ हालचाली ममदापुर परिसरात बघायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -