घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरीत भूसंपादन उपजिल्हाधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरुच

इगतपुरीत भूसंपादन उपजिल्हाधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरुच

Subscribe

शामसुंदर चांडक यांचे अधिकार्‍यांना निवेदन

इगतपुरी : भूसंपादन उपजिल्हाधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरु असून कायदा धाब्यावर बसवत अधिकाराचा गैरवापर करत असल्याची बाब समोर आली आहे. इगतपुरी येथील तळेगाव शिवारात स्थळ निरीक्षणबाबतचे पत्र पीडित भूधारक शामसुंदर चांडक यांना आदल्या दिवशी म्हणजे सोमवार (दि २१) रोजी सायं. 6:06 वाजता पत्र देत मंगळवारी (दि. २२) ला हजर रहाण्याची ताकीद दिली.

विशेष म्हणजे सदरच्या पत्रात भूसंपादन क्रमांक नाही, भूसंपादनाबाबत कुठलेही नकाशे व कागदपत्रेही नाहीत. सदर मिळकतीवर नेमका कोणता भाग संपादन करणार त्याच्या निशाण्या जागेवर नाहीत. अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली जात असून याची पूर्व कल्पना असताना देखील भूसंपादन अधिकारी त्याच खोट्या कागदपत्रांच्या आधारे अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर कार्यवाही पुढे नेत बेकायदेशीर कृत्य करत आहेत. गट 181/1/2 असा 7/12 सरकारी दफ्तरात नाही, सदर जागा बिनशेतीकडे वर्ग झालेली असून त्याचे निरनिराळे मालक आहेत. कोणत्या प्लॉटमधून किती क्षेत्र भूसंपादन होणार याबाबत संयुक्त सरकारी मोजणी झालेली नसल्याने त्याबाबतच्या हद्दीत खुणा मिळकतीवर नाहीत.

- Advertisement -

ही बाब पीडित (खासगी मिळकतदार) भूधारक यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर भूसंपादन अधिकारी सविता कुटे व पेंटेवाड यांना निदर्शनास आणून दिली असून या ठिकाणी शेकडो एकर सरकारी जागा उपलब्ध असताना खासगी मिळकत भूसंपादन करून सरकारी पैशाची उधळपट्टी का केली जात आहे? असा प्रश्न शामसुंदर चांडक यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कोणतीही नवीन योजना नसताना व तेथेच अनेक एकर सरकारी क्षेत्र रिकामे पडून असताना, खासगी मिळकत भूसंपादन करून सरकारी पैशाची उधळपट्टी केली जात आहे. सदरचे भूसंपादन हे कसे चुकीचे व बेकायदेशीर आहे याबाबत पीडित भूधारक शामसुंदर चांडक यांनी कुटे व पेंटावाड यांना प्रसार माध्यमासमोर लेखी निवेदनासोबत महत्वाची कागदपत्रे देऊन निदर्शनास आणून दिले आहे.

सर्व सत्य परिस्थिती पाहात भूसंपादन त्वरित रद्द करून सरकारी पैशाची उधळपट्टी त्वरित थांबवावी अशी मागणी होत आहे. स्थळ निरक्षणाच्या वेळी भूसंपादन अधिकारी ज्योती कावरे प्रत्यक्ष हजर नव्हत्या. या पूर्वीही अनेक वेळा या बेकायदेशीर बाबी कावरे यांना निदर्शनास आणून देखील त्या पदाचा गैरवापर करत आहेत असा आरोप चांडक यांनी केला आहे. स्थळ निरीक्षणप्रसंगी स्थळ निरीक्षण अधिकारी सविता कुटे, पेंटेवाड, तलाठी, शामसुंदर चांडक आदि उपस्थित होते. संबंधित भूसंपादन उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी होणे गरजेची आहे, अशी मागणी चांडक यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -