Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र सावधान! आता, रस्ते खोदणार्‍यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

सावधान! आता, रस्ते खोदणार्‍यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

Subscribe

नाशिक : महापालिकेच्या बांधकाम विभागाने ११ मेपासून महानगर नॅचरल गॅस कंपनीसह अन्य सर्व कंपन्या व त्यांच्या ठेकेदारांना रस्ते फोडण्यावर बंदी घातली आहे. यापुढे कुणी रस्ते फोडताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध थेट फौजदार गुन्हा दाखल करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे. या इशार्‍यामुळे ठेकेदारांची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली असून, नियमबाह्य कामावर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी विभागीय अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.

गॅस पाईपलाईन, विविध कंपन्यांच्या फायबर ऑप्टिक केबल्स, पाईपलाईन अशा विविध कामांसाठी झालेल्या खोदकामामुळे गेल्या दोन वर्षांत शहरातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. यावरुन महापालिका प्रशासनाला नाशिककरांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. एमएनजीएल अर्थात महानगर गॅस लिमिटेड कंपनीने सुमारे १८७ किलोमीटरचे रस्ते खोदले आहेत. यामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यांपायी नाशिककरांना व्याधी जडल्या असून, अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघातही झाले आहेत.

- Advertisement -

आजवर रस्त्यांच्या खोदकामात वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडित होणे यांसारख्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या कामांसह खोदकामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, लहान-मोठे अपघातही झाले होते. रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण एवढे होते की, खड्ड्यांत रस्ता की रस्त्यांत खड्डे अशी स्थिती होती. त्यामुळे वाहनांचे नुकसान होतानाच, नाशिककरांची हाडे खिळखिळी झाली होती. त्यानंतर महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. पावसाळ्यात डांबरीकरण करण्यावर मर्यादा येत असल्याने संपूर्ण पावसाळा नाशिककरांना त्रास सहन करावा लागला. हा अनुभव लक्षात घेत महानगरपालिकेने यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

तसेच, रस्ता फोडण्यावरही कठोर निर्बंध घातले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाशिककरांची यंदा खड्ड्यांच्या त्रासापासून काही प्रमाणात का असेना सुटका होण्याचे संकेत आहेत. महापालिकेने केबल अथवा पाईपलाईनची कामे करणार्‍या संस्थांना व्यावसायिक कारणास्तव रस्ता खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच मुभा दिली होती. मात्र, खासगी कंपन्यांनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी १० दिवसांची अतिरिक्त मुदत मागितली होती. ही मुदतही आता संपली आहे.

गॅसपाईपलाईनसह विविध कामांमुळे नाशिककरांना खड्ड्यांचा खूप त्रास झाला. त्यातच पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही रस्ते फोडणार्‍यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे रस्त्याच्या कामांनाही वेगाने सुरुवात झाली आहे. : शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -