घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमध्यरात्री जेवणाच्या शोधात निघाले, दुचकीचा वेग होता अनियंत्रित, बसला धडकून दोन युवकांचा...

मध्यरात्री जेवणाच्या शोधात निघाले, दुचकीचा वेग होता अनियंत्रित, बसला धडकून दोन युवकांचा दुर्दैवी अंत

Subscribe

नाशिक : जेवणासाठी हॉटेलच्या शोधात निघालेल्या तीन मित्रांच्या दुचाकीचा नवीन सीबीएस परिसरात भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील शुभम कोकाटे आणि शुभम सोनवणे या दोघा महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एका गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत.ही घटना शुक्रवारी (दि.१२) रात्री दोन वाजेदरम्यान घडली.

शुभम संतोष कोकाटे (वय २१, रा. शुभम पार्क, खुटवडनगर, नवीन नाशिक) आणि शुभम प्रशांत सोनवणे (२१, मूळ रा. व्हीआयपी कॉलनी, जळगाव) या दोघांसह जयेश अरूण महाजन (२१, रा. म्हसवड, ता. जि. जळगाव) हे तिघेही एकाच गाडीवरुन सोबत निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कोकाटे, शुभम सोनवणे व जयेश महाजन संदीप फाउंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे विद्यार्थी आहेत. जेवण करण्यासाठी तिघे जण एकाच दुचाकीवरून नवीन सीबीएस परिसरात आले. ते जिल्हा रुग्णालयाकडून त्र्यंबक नाक्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होते. नेमक्या याचवेळी त्र्यंबक नाक्याकडून एक बस ठक्कर बाजार बसस्थानकाकडे वळण घेत होती. त्यावेळी दुचाकीचालकाचे गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने विद्यार्थ्यांची भरधाव दुचाकी बसवर आदळली. या अपघातात शुभम कोकाटे व शुभम सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जयेश महाजन हा गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

सोनवणे आणि कोकाटे या दोन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मुले असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला. शुभम कोकाटेच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला.

वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याआधी काळाचा घाला

शुभम कोकाटे याचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. सार्वजनिक उपक्रमात त्याचा पुढाकार असायचा. तो संदीप फाउंडेशनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. वडिलांचा बांधकाम व्यवसाय असल्याने वडिलांचा व्यवसाय पुढे चालविण्याचे त्याचे ध्येय होते. घरातील कर्ता मुलगा व कुटुंबाचे भविष्यच नष्ट झाल्याने कोकाटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -