घरमहाराष्ट्रनाशिकस्वामी समर्थ महाविद्यालयात बालकवींनी केली काव्यवाचनाची बरसात

स्वामी समर्थ महाविद्यालयात बालकवींनी केली काव्यवाचनाची बरसात

Subscribe

श्री स्वामी समर्थ विद्यालयातील बालकवींच्या चमूने मराठी राजभाषा दिन साजरा

राजूर : मी चाललो शोधण्यास मला, लेकीकडून दुःख मला कधीच नाही मिळालं, मनाची स्वभावाची सुंदरता, तू झालास मूक समाजाचा नायक, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, एक धागा सुखाचा, एकतरी मैत्रीण असावी, ओळखलंत का सर मला, एक तरी बहीण असावी अशा काव्यवाचनाची सुखद बरसात ज्येष्ठ कवींनी नव्हे तर श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बालकवींच्या चमूने मराठी राजभाषा दिनानिमित्त केली.

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने पटांगणात शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी भव्य रांगोळी काढली. छानसे फलक लेखन करून अल्हाददायी व आनंदित वातावरणात कार्यक्रम साजरी करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कविता, चारोळ्या, गवळणी, भाषणे, नृत्य, शिक्षकांच्या कविता असा भरगच्च कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. दहावीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने कविता सादर करून मराठी भाषेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. कणा, कॉलेज कट्टा, मराठी राजभाषेची महती, आकाशी झेप घे रे पाखरा, तू नव्या जगाची आशा ,फक्त मैत्री अशा आशयघन व प्रेरणादायी कविता विद्यार्थ्यानी अतिशय उत्साहाने सादर केल्या.

- Advertisement -

यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दलची आदराची भावना भाषणांमधून व्यक्त केली. त्यानंतर माझ्या नावाने बांधलाय बंगला, या कोळीवाड्याची शान, ढोलकीच्या तालावर ,खंडेराया झाली माझी दैना ,लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी या गीतांवर बाल चमूने सुरेख व सुंदर नृत्य सादर केले.यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी प्रेरणादायी कविता सादर केली. तसेच शिक्षिका मीरा काळे यांनी गवळण, विनायक साळवे यांनी देवनी घिद्यात हातमा नाड्या व माय हे अहिराणी गीत, तानाजी फापाळे यांनी या झोपडीत माझ्या हे काव्य सादर केले.

यावेळी कावेरी जाधव, क्षितीजा लहामगे, तनुजा तांबोळी, संयोगिता मोहटे, आसमा तांबोळी, साक्षी पाबळकर, हाजराबी तांबोळी, तन्वी वंडेकर, कांचन मधे, अनिता मधे, निर्मला परते, सविता मेंगाळ, यश महाले, मृत्युंजय कुलकर्णी, विश्वास आरोटे, सुबोध पवार यांनी कविता वाचन सादर केल्या, तर अक्षरा लहामगे, अनुष्का मुतडक ,लक्ष्मी बोटे, प्रियंका लोहकरे, चंचल मुळे, सोनाक्षी पवार, साई मुतडक, समर्थ मुर्तडक ,नेहा चौधरी, तेजस्विनी मुतडक या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. यावेळी मराठीतील अनेक नामवंत लेखक, कवी, मराठी भाषेसाठी कार्य करणारे मान्यवर या सर्वांचे फोटो, मराठीतील दर्जेदार पुस्तके यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी व पालकांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे सन्मानपूर्वक कौतुक केले .

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -