घरमहाराष्ट्रनाशिकविनापरवाना खासगी फायनान्सविरोधात श्रमिक सेनेकडून आरबीआयकडे तक्रार

विनापरवाना खासगी फायनान्सविरोधात श्रमिक सेनेकडून आरबीआयकडे तक्रार

Subscribe

नाशिक : कर्ज वाटपाचा कोणताही परवाना नसताना रिक्षांसह विविध वाहनांसठी कर्ज देणार्‍या एका खासगी फायनान्स कंपनीविरोधात श्रमिक सेनेने शनिवारी (दि.२३) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य आयकर आयुक्त, वस्तू व सेवा कर आयुक्त, गृह विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणीही श्रमिक सेनेने सरकारी यंत्रणांकडे केली आहे.

फायनान्स कंपनी म्हणून परवाना नसतानादेखील बेकायदेशीरपणे रिक्षा चालक व इतर वाहनांना कर्जाचे वाटप केले जाते. या बदल्यात कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी केली जाते. एवढेच नव्हे तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून थकबाकीदारांना धमकावून वसुली करणार्‍या नहार ऑटो कन्सल्टन्सीची चौकशी करून त्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी श्रमिक सेनेने केली आहे.

- Advertisement -

कंपनीबाबत माहिती घेतली असता नहार यांच्याकडे कर्ज पुरवठा करण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अशिक्षित रिक्षाचालक अथवा वाहनधारकांकडून कर्जाच्या करारनाम्यात नमूद व्याजदरापेक्षा व आरबीआयने घालून दिलेल्या बंधनापेक्षा कितीतरी पटीत अधिक व्याज आकारणी केली जाते. वाहनावर मास फायनान्स नावाने बोजा चढविला जातो. कर्जाचे हप्ते थकल्यास गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून धमक्या देत वसूली केली जाते. जप्त वाहनांचा लिलाव बेकायदेशीरपणे केला जातो. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग होत असल्याचा संशय असून संबंधित कंनपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी श्रमिक सेनेच्या वतीने शहराध्यक्ष मामा राजवाडे यांनी केली आहे.

बेकायदेशीर कर्जवाटप व अव्वाच्या सव्वा व्याजदराने वसूली होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात नहार ऑटो कन्सल्टन्सीच्या नावाने अनेक तक्रारी असल्याने आम्ही हा पत्रव्यवहार केला आहे. सदर नहार फायनान्सच्या विरोधात त्वरित कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून रिक्षाचालकांना न्याय मिळवून देऊ. : मामा राजवाडे, शहराध्यक्ष, श्रमिक सेना

शहरात मोठे रॅकेट

गरजूंना पर्याय नसल्याने विनापरवाना सावकारांचे शहरात मोठे रॅकेट सुरू आहे. विनापरवाना खासगी सावकार पोलिसांना माहित असूनही तक्रार येत नाही म्हणून कारवाईस टाळाटाळ करतात. तक्रार आली तरीदेखील पोलिसांकडून सावकारांची बाजू घेत तडजोडीसाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -