घरमहाराष्ट्रनाशिकगणेशोत्सवापूर्वी कामे पूर्ण करा, अन्यथा...

गणेशोत्सवापूर्वी कामे पूर्ण करा, अन्यथा…

Subscribe

नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे महापालिका आयुक्तांसह स्मार्ट सिटी अधिकार्‍यांना निवेदन

नाशिक : आगामी गणेशोत्सवासाठी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे विविध मुद्यांबाबत महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली गजानन शेलार, रामसिंग बावरी, विनायक पांडे, सत्यम खंडाळे, राजेंद्र बागूल, गणेश बर्वे, बबलू परदेशी, प्रथमेश गीते, महेश महंकाळे, पोपटराव नागपुरे यांसह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवापूर्वी सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा मंडळ पदाधिकार्‍यांकडून देण्यात आला.

एक खिडकी हवी, जाहिरात कर नको, विद्युत तारा भूमिगत करा; आयुक्तांना साकडे

श्री गणेश मंडळाच्या उत्सव परवानगी अर्जास एक खिडकी योजने अंतर्गत परवानगी देण्यात यावी. नाशिक महानगर पालिका, नाशिक पोलीस आयुक्त व नाशिक वाहतूक पोलीस यांची एकत्रित परवानगी एक खिडकी योजनेतून देण्यात यावी. एक खिडकी योजनेसाठी स्वतंत्र कक्ष व अधिकारी नेमण्यात यावा. परवानगी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने स्वीकारण्यात यावा, तसेच अर्ज दिल्यानंतर २४ तासांत परवानगी देण्यात यावी. मंडळांना मिळणार्‍या जाहिरातीवर कोणताही कर आकारण्यात येऊ नये, तसेच गणपती मंडळांची मंडळ शुल्क ही कर मुक्त असावी. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत काम करण्यात येत असून जागोजागी खोदलेल्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात यावे. रस्त्यावरील गणेश मंडळाच्या जवळ जमा होणारा कचरा व मलबा याची विल्हेवाट लावण्यात यावी. गणेश मिरवणूक मार्गावरील असलेल्या आडव्या विद्युत तारा भूमिगत करा. तसेच शहरातील बंद असलेले हायमास्ट व विद्युत दिवे यांची त्वरित दुरुस्ती करून ते कायम सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. गणपती उत्सव काळात सायंकाळी ६ वाजेनंतर शहरात कार्यरत असलेल्या सिटीलिंक बसचे अशोक स्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी या भागातील मार्ग बदलण्यात यावेत आदी महत्त्वाच्या मागण्या गणेश महामंडळ पदाधिकार्‍यांकडून महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
भालेकर मैदान त्वरित मोकळे करा, रस्त्यांची कामे करा; स्मार्ट सिटीकडून अपेक्षा

बी. डी. भालेकर हायस्कूल मैदानात मोठमोठ्या गणेशोत्सवाचे देखावे साकारले जातात. परंतु, यावर्षी तेथे पाईप, मलबा, इलेक्ट्रिक वायर्स याचा मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. तो तातडीने दूर करावा. स्मार्ट सिटीच्या कामामुळे महावितरणच्या लाईन्स अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत, तेथे त्वरित नवीन केबल टाकाव्यात, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. स्मार्ट सिटी व महावितरणच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची त्वरित दाखल घेऊन कारवाई करावी. स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसवावेत, त्यामुळे वाहतूक पोलीस व बंदोबस्तावरील पोलिसांचा ताण कमी होईल. स्मार्ट सिटीने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून प्रस्तावित कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत. जे ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असतील त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांचे कामे काढून इतर ठेकेदारांना द्यावे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. त्यानंतरच दुसरी कामे पूर्ण करावीत. गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग त्वरित पूर्ण करावा. या मार्गावरील प्रलंबित डांबरीकरण, काँक्रिटीकरणाची कामे तसेच या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावीत. महावितरण केबल्स भूमिगत कराव्यात. रस्त्याच्या साईडपट्ट्यांची कामे त्वरित करावीत. शहरातील व पंचवटी परिसरातील सर्व कामे गणेश उत्सव सुरु होण्यापूर्वी पूर्ण करावीत अन्यथा शहरातील सर्व गणेश मंडळे खळखट्याक आंदोलन करतील, असा इशारा स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -