घरमहाराष्ट्रनाशिककपालेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धनाला सुरुवात; वादाचीही ठिणगी

कपालेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धनाला सुरुवात; वादाचीही ठिणगी

Subscribe

पंचवटी : रामकुंडावरील प्राचीन असलेले प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार कामास मंगळवारी (दि.१५) प्रत्यक्ष सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात मंदिरास गळती लागली होती. तसेच अनेक ठिकाणी मंदिर बांधकाम जीर्ण झाल्याने मंदिराची होणारी झीज थांबविण्यासाठी मंदिर प्रशासनाने रीतसर टेंडर काढून मंदिर जीर्णोद्धार कामास परवानगी मिळवली आहे. पुढील सहा महिन्यांत मंदिर जीर्णोद्धार काम सुरू राहणार असून, या कालावधीत मंदिर दर्शन सर्वांसाठी सुरू ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली असल्याचे, मंदिर विश्वस्त मंडलेश्वर काळे यांनी सांगितले.

रामकुंडावरील पुरातन काळापासून इतिहास असलेले कपालेश्वर महादेव मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे बांधकाम सद्यस्थितीत जीर्ण झाले असल्याने, पावसाळ्यात पावसाचे पाणी अनेक ठिकाणी झिरपते. मंदिर घुमट, सभामंडप तसेच अन्य दगडी बांधकामाची झीज झाली आहे. पुजारी तसेच भाविक भक्तांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर मंदिर प्रशासनाने मंदिराचे २५ डिसेंबर रोजी ’स्ट्रक्चरल ऑडिट’ केले गेले होते. काही ठिकाणी बांधकाम कमकुवत होऊन गळती लागली असल्याचे समोर आले. यानंतर मंदिर प्रशासनाने बैठका घेऊन मंदिर बांधकाम जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या कामाचे टेंडर काढण्यात येऊन कामाचे आर्किटेक किरण कलमदानी तर कामाची वर्क ऑर्डर सवानी कन्झर्वेशन कंपनीला दिली गेली असून, सुरू झालेले जीर्णोद्धार बांधकाम याच कंपनीच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे काळे यांनी सांगितले. जवळपास ४० लाख रुपये खर्च करून हे जीर्णोद्धार बांधकाम केले जाणार आहे. पुढील सहा महिन्यात हे सर्व बांधकाम पूर्ण केले जाणार असून, या कालावधीत मंदिर दर्शन खुले ठेवण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.

- Advertisement -

वादाची ठिणगी

मंगळवारी (दि.१५) मंदिर जीर्णोद्धार बांधकाम सुरू झाले असल्याने, दुपारच्या सुमारास मंदिर विश्वस्त कार्यालय विश्वस्त मंडलेश्वर काळे उपस्थित होते. यावेळी मंदिराचे गुरव पुजारी पप्पू गाडे यांनी याठिकाणी येऊन, मंदिर बांधकाम कोणाला विचारून सुरू केले असा सवाल केला. कपालेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार बांधकाम सुरू करण्यासाठी मंदिर गुरव पुजारी यांच्यासह स्थानिक भाविक भक्तांना मंदिर प्रशासनाने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप यावेळी गाडे यांनी केला. इतका मोठा खर्च मंदिर प्रशासनाला परवडणारा नाही. त्यांनी एवढी मोठी रकमेची तरतूद कशाप्रकारे केली आहे. मंदिर विश्वस्त बरखास्त करण्यात आले असून, सद्यस्थितीत प्रशासक असताना इतका मोठा खर्च करण्याची गरज काय असा प्रश्न पप्पू गाडे यांनी उपस्थित करीत प्रखर विरोध दर्शविला. यावेळी मंदिर विश्वस्त कार्यालयात शाब्दिक चकमक उडाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुरव, पुजार्‍यांसह भक्तांमध्ये नाराज

शिवलिंगाची झालेली झीज याबाबत देखील पुजारी गुरव, भक्त आणि विश्वस्त यांच्यात काही वर्षांपूर्वी एक बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी शिवलिंगाच्या कामाला प्राधान्य देण्याबाबत चर्चा झालेली असताना आता हे काम सुरु केल्याने गुरव पुजारी आणि भक्तांमध्ये नाराजी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -