घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या आयटी हबची आज मुर्हूतमेढ

नाशिकच्या आयटी हबची आज मुर्हूतमेढ

Subscribe

महापौरांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; कॉन्फरन्समध्ये होणार विविध कंपन्यांसोबत करारनामा

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून आडगाव येथे साकारण्यात येणार्‍या आयटी हब प्रकल्पाच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१) होणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून साकार होणार्‍या या प्रकल्पानिमित्त आयोजित चर्चासत्रात १७५ हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. या प्रकल्पामुळे दोन लाख युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे महापौर म्हणाले.

रोजगाराची मुबलक संधी उपलब्ध करण्याबरोबरच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक शहरात उभारण्यात येणार्‍या आयटी हबच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे. आगामी पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर महापौर कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविला जात आहे. नाशकातील शेकडो युवकांना रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि बंगळुरू येथील आयटी कंपन्यांमध्ये जावे लागते. या भूमिपुत्रांना नाशकातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येथे आयटी हब व्हावे, यासाठी आपण २०१२ मध्ये उपमहापौर असताना संकल्पना मांडली होती. आयटी शिक्षण घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वॉकेथॉनही झाली. यानंतर महापौरपद लाभल्यानंतर आडगाव शिवारात आयटी हब उभारण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचे महापौरांनी सांगितले. सुमारे १७५ हून अधिक आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी चर्चासत्रात भाग घेतील. या चर्चासत्राअंती काही आयटी कंपन्यांसमवेत करारही केला जाणार असल्याचे ते म्हणाले.परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. हेमंत गोडसे, नाशिक प्रभारी आ. गिरीश महाजन, सहप्रभारी आ. जयकुमार रावल, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. अ‍ॅड. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे आदी उपस्थित राहणार आहेत.

असा आहे प्रकल्प

  • यूडीसीपीआर मधील तरतुदीनुसार ग्रीन कल्चरल झोन (शेती)मध्ये आयटी पार्कचा वापर अनुज्ञेय करण्यात आला आहे
  • सध्यस्थितीत आडगावमधील ग्रीन कल्चरल झोनमध्ये समाविष्ट ३४० एकर क्षेत्रासाठी जागामालक यांनी पालिकेकडे संमती दर्शवली
  • पालिकेने प्रकल्पाकरिता तज्ञ सल्लागारांची निवड केली आहे
  • तज्ञ सल्लागारांमार्फत जागा मालक व प्रकल्पात समाविष्ट होणारी कंपनी यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येईल
  • तज्ञ सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी भारतातून व भारताबाहेरुन मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय्य उपलब्ध
  •  मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची राहील

दोन लाख युवकांना रोजगाराची संधी

आयटी हब उभारणारी नाशिक महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. आयटी हबसाठी महापालिका भूसंपादन करणार नाही, तर भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिल्या जातील. आयटी हब विकासातून महापालिकेला प्रीमिअम शुल्कापोटी ३०० कोटींचा महसूल उपलब्ध होईल. सुमारे दोन लाख युवकांना या आयटी हबमध्ये रोजगार संधी मिळेल. आयटी परिषद महापालिकेची नाही, हे सांगण्यासाठी प्रशासनावर कुणाचा दबाव आहे, हे त्यांचे तेच जाणोत.  – सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -