घरमहाराष्ट्रनाशिकवाडिवर्‍हे वीज वितरण कार्यालयावर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

वाडिवर्‍हे वीज वितरण कार्यालयावर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

Subscribe

शेतकरी संघटना, खासदार, आमदारांची उपस्थिती

अस्वली स्टेशन : इगतपुरी तालुक्यातील वाडिवर्‍हे वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर शेतकर्‍यांची वीज तोडल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वाडिवर्‍हे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यास पाठिंबा देण्यासाठी शेकडो शेतकरी सकाळी 11 पासून दुपारी ४ पर्यंत बसून होते. शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी वीज वितरण अधिकार्‍यांना धारेवर धरले. जोपर्यंत विना अट वीजपुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. यावेळी अभियंता धवल आगरकर यांनी शांततेचे आवाहन केले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, शेतकरी संघटनेच्या पश्चिम महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरवडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, राष्ट्रवादीचे गोरख बोडके, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धूमाळ,अर्जुन बोराडे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राजू नाठे, वाडिवर्‍हेचे सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, गणपत जाधव, लकी गोवर्धने, किसन शिंदे, मुरंबीचे सरपंच बापू मते, उपसरपंच दत्तू मते, शंकर गोवर्धने, योगेश मालुंजकर, गोकुळ गुळवे, अंबादास धोंगडे, संदीप गव्हाणे उपस्थित होते. शेतकरी संघटनेने याबाबत काल तहसीलदार, पोलीस स्टेशन, वीज वितरण कार्यालय, इगतपुरी, वाडिवर्‍हे यांना आंदोलनाचे निवेदन दिले होते.

- Advertisement -

शेतकर्‍यांना कुठलीही पूर्व सूचना न देता वीज वितरण कंपनीने शेतीची वीज तोडल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी वीज वितरणवर मोर्चा नेत जोपर्यंत विनाअट वीजपुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालया समोरून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते.

यावेळी नाशिकचे वीज अभियंता डोंगरे यांनी शासनाच्या धोरणानुसार सर्व शेतकर्‍यांनी वीबिल भरून सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. मात्र शेतकर्‍यांनी ती नाकारली. यावेळी खा. हेमंत गोडसे, आमदार खोसकर, गोरख बोडके यांनी देखील शेतकर्‍यांसोबत असल्याची भूमिका घेतली. मात्र तरीही अनेक शेतकर्‍यांनी घोषणा देवून आम्हाला फुकटची सहानुभूती नको शेतकर्‍यांचे हित लक्षात घ्या अशी बाजू मांडली. परंतु आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. निरीक्षक अनिल पवार यांचे मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक कांचन भोजणे, सोमनाथ बोराडे व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -