घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रम्हसरूळटेकमध्ये आगीचा भडका; ३ घरे आगीच्या भक्षस्थानी

म्हसरूळटेकमध्ये आगीचा भडका; ३ घरे आगीच्या भक्षस्थानी

Subscribe

नाशिक : दाट लोकवस्ती असलेल्या भद्रकालीतील म्हसरूळटेक परिसरात बुधवारी (दि.५) दुपारी 12.30 वाजता तीन घरांना आग लागली. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी जाण्यास आलेला अडथळा आणि आगीचे लोट सर्वत्र पसरल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी तीन घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग विझवताना एक युवक जखमी झाला तर धुरामुळे एक अग्निशमन दलाच्या एका जवानास अस्वस्थ वाटू लागले होते. ही बाब जवान आणि नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जवानास सुरक्षितस्थळी आणले. त्यामुळे संबंधित जवानास होणारा त्रास कमी झाला.

बुधवारी (दि.५) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास म्हसरूळ टेक भागातील जुन्या घरांना आग लागला. या घराच्या पहिल्या मजल्यावर सागर कुंडलिंक पेंढारकर कुटुंबियांसह राहतात. तर खालच्या मजल्यावर महेश राजेंद्र पवार व सुरेश छगन साळुंखे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या शेजारी दीपक कुंभकर्ण यांचा पितळचा कारखाना असून, हा कारखाना अनेक वर्षांपासून बंदअवस्थेत आहे. आग लागली त्यावेळी घरांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि दोन पुरुष होते. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने सर्वांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे जिवितहानी टळली. तितक्यात आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी वाढली. नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक कर्मचार्‍यांनी सिलिंडर घराबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घरातून दिवसभर धूर येत असल्याने पुन्हा दुर्घटना घडू नये, यासाठी एक बंब घटनास्थळी ठेवण्यात आला होता.

- Advertisement -
अरुंद रस्त्यांमुळे अडथळे अन् जवानांची दमछाक

 आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शिंगाडा तलाव भागातील मुखालयासह पंचवटी आणि के. के. वाघ अग्निशमन केंद्रातील जवान बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. आधीच म्हसरूळटेक परिसरातील रस्ते अरुंद असल्याने आणि आग लागली त्या घरापर्यंत जाणारा रस्ताही अरुंद असल्याने जवानांना मोठी कसरत करावी लागली. बडी दर्गा परिसरात जवानांनी उतार असलेल्या रस्त्याच्या कडेला बंबा उभा करुन पाण्याचे पाईप घरापर्यंत ओढत नेले. त्यानंतर पाईपव्दारे पाण्याचा मारा केला. जवानांनी अवघ्या दोन तासात पाच बंबांसह आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये मुख्यालयाचे तीन, पंचवटी व के. के. वाघ अग्निशमन केंद्राचा एक बंबाचा समावेश आहे. अग्निशामक विभागाचे अधिकारी संजय बैरागी, राजेंद्र बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली लीडिंग फायरमन इकबाल शेख, सोमनाथ थोरात, इसाक शेख, ज्ञानेश्वर दराडे, अनिल गांगुर्डे, उदय शिर्के, नाजिम देशमुख, एम. एस. पिंपळे, एन पी म्हस्के, डी. आर. गाडे यांनी आगेवर नियंत्रण मिळविले.

अशा आल्या अडचणी
  • भद्रकालीतील म्हसरूळटेक परिसरात जुन्या वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. ते वाडे धोकादायक अवस्थेत आहेत.
  • रस्त्यांलगतच बांधकाम करण्यात आल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.
  • आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळापर्यंत नेताना जवानांना अडचणींना सामोरे जावे लागले.
  • महापालिकेने धोकादायक वाडे व अतिक्रमण काढत रस्ते रुंद करावे, अशी मागणी दीपक कुंभकर्णी यांच्यासह नागरिकांनी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -