इगतपुरीतील तिहेरी खूनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

२०१८ मध्ये चार वर्षाच्या पुतण्यासह चुलती, वहिणींची निर्घृण हत्या करणार्‍यास सहावर्षीय यशच्या साक्षीने मिळाली शिक्षा

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील माळवाडीत चुलती, चुलत वहिनी आणि अवघ्या चार वर्षांच्या पुतण्यावर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना २०१८ साली घडली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या तिहेरी खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश एम. व्ही. भाटिया यांनी आरोपी सचिन नामदेव चिमटे (वय २४, रा. चिमटे वस्ती, माळवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याला बुधवारी (दि. २०) मरेपर्यंत जन्मठेप आणि ३ लाख रुपयांंची
शिक्षा सुनावली.

३० जून २०१८ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास इगतपुरीतील माळवाडीत घडलेल्या या हत्याकांडात हिराबाई शंकर चिमटे (वय ५५), मंगला गणेश चिमटे (वय ३०), रोहीत गणेश चिमटे (वय ४, सर्व रा. चिमटे वस्ती, माळवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) या तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांनी करत जिल्हा न्यायालयात पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश एम. व्ही. भाटिया यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी ठोस पुरावे, १२ साक्षीदार व तांत्रिक माहिती सादर केली. या पुराव्यांच्या आधारे न्या. भाटिया यांनी आरोपी सचिन चिमटे यास प्रत्येक खुनात जन्मठेप अशाप्रकारे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ३ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. दंडाची रक्कम मयतांच्या नातलगांना देण्याचेही आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.

काय होती घटना ?

आरोपी सचिन चिमटे हा मयत हिराबाई यांचा पुतण्या होता. जमिनीचा वाद आणि सतत शिक्षण, नोकरीवरून त्याला टोमणे मारले जात असल्याने संतापून त्याने वहिनी मंगला यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर वृद्ध चुलती हिराबाई यांच्याही गळ्यावर त्याने धारदार चाकूने वार केले. यावेळी तेथे खेळत असलेल्या चार वर्षांच्या रोहितच्याही गळ्यावर वार करून सचिनने तिघांची हत्या केली. याचवेळी तेथे आलेल्या सहा वर्षांच्या यश याच्यावरही चाकूहल्ला करत सचिनने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो जखमी अवस्थेत रस्त्यावर उभ्या नागरिकांपर्यंत कसाबसा पोहोचला. त्यामुळे नागरिकांनी चिमटे वस्तीकडे धाव घेत आरोपी सचिनला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला चालून लहानग्या यशच्या साक्षीने सचिनला जन्मठेपेची शिक्षा झाली.