घरमहाराष्ट्रनाशिककैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : दीर्घमुदतीच्या ठेवींवरही मारला डल्ला

कैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : दीर्घमुदतीच्या ठेवींवरही मारला डल्ला

Subscribe

नाशिक : नाशिक कैलास नागरी पतसंस्थेत ठेवीदारांच्या चुकीच्या नोंदी टाकून खातेदारांचे नाव बदलून मुदत ठेव खात्यातून तब्बल २० लाख रुपयांचा अपहार झाला आहे. मोठ्या ठेवीदारांच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर डल्ला मारण्यात आला असून संगणकात फेरफार करून रक्कम रक्कम उडवल्याचे लेखापरीक्षण अहवालात दिसून येत आहे. दरम्यान, सनदी लेखापाल अनिल घैसास आणि शासकीय लेखा परीक्षकांनी केलेल्या परीक्षणात मोठी तफावत असून त्यामुळे पुन्हा एकदा ठेवीदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

संस्थेतील मुदत ठेवींचे व्यवहार पाहता कर्मचार्‍यांनी ठेव खात्यात पैसे जमा दाखवून रोख रक्कम उडवली आहे. ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी काढून घेतल्याचे भासवून सर्व संस्थेतील कर्मचार्‍यांनी अपहार केल्याचे लेखापरीक्षणात म्हटले आहे. ही रक्कम काढताना अर्धवट काढून काही रक्कम जमा दाखवली आहे. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण रक्कम हडप केल्याचे लेखापरीक्षणात म्हटले आहे. यासाठी संगणकात मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले असून, संगणकामधील असुरक्षितता या अपहराला कारणीभूत असल्याचे लेखापरीक्षकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्र्यंबक शहरातील काही मोठ्या ठेवीदारांनी अत्यंत विश्वासाने संस्थेत मोठ्या रकमेच्या ठेवी ठेवल्या होत्या त्यांच्याच विश्वासाला संस्थाचालकांनी तडा दिला असून, दीर्घ कालावधीच्या मुदत ठेवींवर व्हाईट कॉलर दरोडेखोरांनी डल्ला मारला आहे. कॅश स्क्रोलला याच्या काही नोंदी केल्या असून, काही केल्याच नाहीत. तसेच, काही खातेदारांचे व्हाऊचर तयार केले असून काहींचे केलेच नाहीत. कर्मचार्‍यांवर संस्थाचालकांचा कुठलाही वचक नसल्याने राजरोसपणे खोटे व्हाऊचर भरून रकमा उडविल्याचे लेखापरीक्षणात म्हटले आहे. या व्हाउचर्सवर व्यवस्थापक शैलेंद्र गायकवाड आणि संबंधित कर्मचार्‍यांनी सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे या अपहरणातील व्यवहारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

संस्थेच्या नियमानुसार डे बूक नियमित प्रिंट करून तपासले असते तर या प्रकाराला या प्रकाराला वेळीच आळा घालता आला असता. कामकाजातील दिरंगाईमुळेच अपहार करणार्‍यांना रान मोकळे मिळाल्याने ठेवीदारांची तब्बल 20 लाख 35 हजार 340 रुपये गिळंकृत करण्यात कर्मचार्‍यांना यश आल्याचे अहवालात म्हटले आहे या दोन्ही अहवालाबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून, अनिल गायकवाड यांनी केलेल्या लेखापरीक्षणात 20 लाख 35 हजार 340 रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

तर, शासकीय लेखा परीक्षक एसटी शिंदे यांनी केलेल्या लेखा परीक्षणात नऊ लाख 40 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही लेखापरीक्षणात गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. लेखापरीक्षण अहवालातील गोंधळामुळे पतसंस्थेकडून मोठा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्र्यंबकमधील काही ठेवीदारांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबक शहरात होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -