घरताज्या घडामोडीऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास १७ टक्क्यांनी महागला

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास १७ टक्क्यांनी महागला

Subscribe

प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय, चाकरमान्यांना आर्थिक झटका

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली असतानाच आता एसटी महामंडळानेही भाडेवाढीचा निर्णय घेत त्यात तेल ओतले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसह, नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी तापदायी ठरणार आहे.

एसटी महामंडळाने इंधन दरवाढ तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींचे कारण देत महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी सोमवारपासून भाडेवाढ लागू केली. महामंडळाने तीन वर्षांनंतर १७.१७ टक्के भाडेवाढ लागू केली असून तिकिटात किमान ५ रूपयांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

पेट्रोलच्या किंमती प्रतिलिटर ११३ रुपयांवर, तर डिझेलचे दर १०० रुपयांवर गेल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दरवाढ अटळ होती. मात्र, ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होईल, अशी अपेक्षा नव्हती. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एकूण प्रवासभाड्यात १७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिकिलोमीटरमागे २१ पैशांची वाढ होणार आहे.

महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती.

- Advertisement -

वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत आहे.

आज मध्यरात्रीपासून लागू होणार भाडेवाढ

२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा त्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

रातराणीचे अतिरिक्त दर रद्द

तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. आज, मंगळवारपासून सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसा आणि रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -