घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी मुंढे यांची तडकाफडकी बदली

मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी मुंढे यांची तडकाफडकी बदली

Subscribe

नवनियुक्त मुख्याधिकारीपदी सचिन पटेल

मनमाड : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सचिन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांनी ही तातडीने मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी मुंढे यांची अवघ्या एका वर्षात ती देखील तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

मुंढे हे मनमानी पद्धतीने कामकाज करतात, कोणाचेही ऐकून घ्यायचे नाही, त्यांच्या कार्यकाळात शहरातील समस्या सुटण्याऐवजी वाढत जात होत्या. असा आरोप त्यांच्यावर नगरसेवकापासून नागरिकांपर्यंत सर्वच जण करीत होते. त्यामुळे त्यांची एक वर्षाची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती, असे नागरिकांनी मत व्यक्त केले. नवनियुक्त मुख्याधिकारी पटेल यांच्यावर शहरात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासोबत नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी असून त्यांच्या कार्यकाळात शहरातील समस्या मार्गी लागतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर मनमाड एकमेव मोठे शहर असून सुमारे सव्वालाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरात ब वर्ग नगरपरिषद आहे. तब्बल 120 कोटी रुपये वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या पालिकेत दमदार आणि शहरासोबत प्रशासनाला शिस्त लावणारा मुख्याधिकारी असणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची बदली झाल्यानंतर तांच्या जागी वर्षभरापूर्वी विजयकुमार मुंढे यांची नियुक्ती झाली होती. पालिकेची सूत्रे हाती घेताच त्यांनी नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान भेटावे असा फतवा काढला होता तेथूनच वादाला सुरुवात झाली.

नंतर वेगवेगळे आरोप त्यांच्यावर होऊ लागले. शिवाय वागदर्डी धरणातून येणारी मुख्य पाईप लाईन लिकेज, रस्त्यावर पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पसरलेले घाणीचे साम्राज्य, पालिकेतील कामगारांच्या अंतर्गत बदल्या केल्यामुळे उडालेला गोंधळ आदीमुळे त्यांच्यावर सर्वांचीच नाराजी वाढली होती. काही पक्ष आणि संघटना तर त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याअगोदर त्यांची तडकाफडकी बदली झाली.

- Advertisement -

नवीन मुख्याधिकारी आले व त्यांनी पदभार स्वीकारला असून त्यांना सर्वात प्रथम अर्धवट पडलेले रस्त्याची कामे तातडीने कसे सुरु करता येईल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शिवाय इतर रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य व इतर समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष तर द्यावे लागणार आहेच याव्यतिरिक्त मुख्याधिकार्‍यांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली कडवट भावना दूर करावी लागणार आहे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -