घरमहाराष्ट्रनाशिकस्वच्छतादूत गाडगे महाराजांच्या स्मारकात अस्वच्छतेचा कळस

स्वच्छतादूत गाडगे महाराजांच्या स्मारकात अस्वच्छतेचा कळस

Subscribe

पुण्यतिथीला सफाई करण्याचाही नाशिक महानगरपालिकेला विसर

नाशिक –  ‘त्या फूलपत्रांपेक्षा माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे’, असं वर्‍हाडी बोलीत ठणकावत स्वच्छतेचे धडे देणारे स्वच्छता दूत संत गाडगे महाराज यांच्या स्मारकात त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तरी महापालिकेचा खराटा फिरावा अशी अपेक्षा करणार्‍यांची घोर निराशा प्रशासनाने केली आहे.

गाडगे महाराजांच्या नावाने शासनाचे पुरस्कार घेणार्‍या महापालिकेला त्यांच्या स्मारकाचाच विसर पडावा यापेक्षा दुसरे दुर्देव ते कोणते? राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६५वी पुण्यतिथीनिमित्त अनेक सरकारी कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. गाडगे महाराज स्वच्छता अभियानात सहभागी होणार्‍या नाशिक महापालिकेला मात्र महाराजांच्या पुण्यतिथीचाच विसर पडला. महापालिकेने गोदावरी नदीच्या तीरावर १५ वर्षापूर्वी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे काम चालू केले. इमारत बांधून पूर्ण झाली असून यात गाडगे महाराज यांचा पुतळा मात्र बसविण्यात आलेला नाही. परिणामी हे स्मारक आजही रखडलेल्या अवस्थेत आहे. परिसराला बकाल रुप प्राप्त झाले असून अक्षरशः कचराकुंडीत रुपांतर झाले आहे.

- Advertisement -

कोट्यवधींचा खर्च; पण पुतळ्यासाठी निधी नाही

स्मारक इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. कोणत्याही प्रकारची निगा राखली जात नाही. स्थानिक रहिवासी कपडे सुकवण्यासाठी, तसेच थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी या जागेचा वापर करतात. कचरा साचल्याने स्मारकात पर्यटक येण्याचेही टाळतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. गाडगे महाराजांनी ५० वर्षांपूर्वी येथेच अपंग व गरिबांसाठी धर्मशाळा स्थापन केली. पंचवटीत रामकुंड, तपोवन, सीतागुंफा, काळाराम मंदिर ही धार्मिक स्थळे येत असल्याने चांगले पर्यटनस्थळ निर्माण व्हावे व गाडगे महाराजांचे विचार सर्वत्र पोहोचावे, यासाठी हे स्मारक आहे. मात्र, तो उद्देश साध्य होत नाही. कोट्यवधींची कामे करणार्‍या महापालिकेकडे पुतळ्यासाठी निधी नाही, ही दु:खदायक बाब असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाची साफसफाई त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तरी करणे अपेक्षीत होते. परंतु त्याकडे महापालिकेने दुर्लक्षच केले. स्मारकाची इमारत बांधून पूर्ण आहे. मात्र तेथे पुतळा उभारण्यात आलेला नाही. या स्मारकाच्या विकासासाठी महापालिकेने योग्य कार्यवाही करावी यासाठी वेळोवेळी महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. – नीलेश बस्ते, सामाजिक कार्यकर्ते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -