घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपरदेशी टोळीच्या म्होरक्याला 'त्या' खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप; कोष्टी, मोरे, दिवेसह ७ जणांना...

परदेशी टोळीच्या म्होरक्याला ‘त्या’ खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप; कोष्टी, मोरे, दिवेसह ७ जणांना कारावास

Subscribe

नाशिक : पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोडवरील भेळ विक्रेता सुनिल वाघ याचा पुर्वमैनस्यातून दगडाने ठेचून खून केल्याच्या आणि त्याचा भाऊ हेमत याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरविले आहे. यामध्ये मुख्य आरोपी कुंदन परदेशी यास जन्मठेपेची तर गुन्ह्यात सहभागी आरोपीमध्ये राकेश कोष्टी, जयेश दिवे, व्यंकटेश मोरे, किरण नागरे यांना सात वर्ष आणि उर्विरत तिघांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यातील दोन आरोपी हे भाजपचे पदाधिकारी असल्याने राजकीय वर्तुळात देखील या निकालाची चर्चा सुरु आहे.

शहरात चांगलाच चर्चेचा विषय असलेल्या या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी बघितले. आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रभावी युक्तीवाद आणि सबळ पुरावे सादर केले. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात प्रमुख १५ साक्षीदार फितूर झाले असून न्यायालयाने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत.

- Advertisement -

मखमलाबादरोड वरील क्रांतीनगर येथे भेळविक्रेता सुनील रामदास वाघ याची २७ मे २०१६ रोजी दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत संशयित आरोपींनी त्याची आई व भाऊ हेमंत याच्यावरही हल्ला केला होता. धारदार शस्त्राने व दगडाने प्राणघातक हल्ला केल्याने हेमंत वाघ हा देखील गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी भाऊ हेमंत व आईच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात खून व प्राणघातक हल्ल्याचा गु्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित कुंदन सुरेश परदेशीसह त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील सर्वच संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर त्यावेळी मोक्कान्वये कारवाई केली होती.

तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले, उपनिरीक्षक व्ही.एस. जोनवाल, आर.एस. नरोटे, बी.बी. पालकर यांच्या पथकाने सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टीने मेहनत घेऊन तपास पुर्ण करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्यासमोर होवून न्यायालयाने मुख्य आरोपी कुंदन परदेशी यास खून प्रकरणी दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर, आरोपी राकेश कोष्टी, जयेश दिवे, व्यंकटेश मोरे आणि किरण नागरे यांना सात वर्षे आणि अक्षय इगळे, रविंद्र परदेशी, गणेश कालेकर यांना दोन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -