घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या विकासाचा साक्षीदार "राजेबहाद्दर वाडा"

नाशिकच्या विकासाचा साक्षीदार “राजेबहाद्दर वाडा”

Subscribe

नाशिकच्या प्रारंभीच्या विकासात पेशव्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या पदरी असलेल्या रास्ते, पेठे, होळकर, शिंदे, गायकवाड, विंचूरकर, राजेबहाद्दर या प्रमुख सरदारांपैकी पेशव्यांनंतर नाशिकच्या विकासाचे दिग्गज म्हणून सरदार नारोशंकरांचा नामनिर्देश व कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. माळवा प्रांत जिंकण्याकरिता उत्तरेकडे मोहिमेवर गेलेल्या उदोजी पवार यांच्या विश्वासू मंडळीत राजेबहाद्दरांचे मूळ पुरुष नारोशंकर हे प्रमुख होते. मल्हारराव होळकर यांच्याकडे नेमणूक झाली. तेव्हा त्यांच्या कर्तबगारीच्या गौरवार्थ जरीपटका नौबत व १५ लाखांचा सरंजाम देऊन त्यांना सुभेदारी देण्यात आली. राघोबांच्या कारकीर्दीत काही काळ प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. पानिपतच्या युद्धात दिल्ली जिंकण्यातील कौशल्याबद्दल त्यांना राजेबहाद्दर हा किताब देण्यात आला.

विशेष म्हणजे, मालेगावच्या आसपासची अनेक गावे जहागिरी म्हणून त्यांना मिळाली. गोदेला वैभव प्राप्त करून देण्याचा निश्चय पेशवे व त्यांच्या अनेक सरदारांनी केला. नंदीशिवाय असलेल्या भगवान शंकराचे मंदिर म्हणून भारतात उपज्योतिर्लिंगाचा धार्मिक दर्जा असणारे नाशिकचे कपालेश्वर मंदिर नारोशंकर राजेबहाद्दर यांनी १७३८ मध्ये बांधले. तर नाशिक तेव्हापासून आजमितीपावेतो ज्या मंदिराच्या बोधचिन्हाने गौरवांकित केले जाते ते श्री रामेश्वर मंदिर १७४७ मध्ये त्यांनी बांधले. मराठ्यांच्या पराक्रमाच्या यशोगाथेचा निनाद म्हणून वसईच्या लढाईत प्राप्त झालेली प्रचंड घंटा त्यांनी श्रीरामेश्वर मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ लावली. अनेक शतकांपासून मराठ्यांच्या विजयाची द्वाही फिरविणारी घंटा आजही अस्तित्वात आहे. हे मंदिर नारोशंकर या नावाने प्रसिध्द आहे. या दिरासमोर सुंदर घाट त्यांनी बांधला, असे हे राजे सेनापती मुत्सद्दी घराणे.

- Advertisement -

देव, देश आणि धार्मिक कारणास्तव नाशिकनगरीतली प्रसिध्द चौकांचा इतिहास सांगतांना घराण्याचा इतिहास सांगण्याकडे कल दिसेल खरा, तथापि हा उल्लेख मुख्यत्वे नव्या नाशिकची आधुनिक बांधणीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा नव्या नाशिकमधील प्रथम प्रणेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा भव्य वास्तू राजेबहाद्दर यांचा सरस्वती ते हत्तीखाना (म.गांधी पथ) या रस्त्यालगत बांधल्या. राजेबहाद्दरांनी मुख्य रस्त्यावरील भव्य कलात्मक वाड्यात दिवाणे आम व दिवाणे खास अशा सभांची व्यवस्था केलेली होती. त्या सभा महिलांना ऐकता व पाहता याव्यात म्हणून खास लोखंडी पडद्याच्या खिडक्यांची व्यवस्था केलेली होती. सरदार राजेबहाद्दर सभेसाठी हत्तीवर बसून येत असत. दिवाणे खासमध्ये सरदारांच्या गोपनीय बैठकी, तर दिवाणे आममध्ये दुय्यम सरदार व सुभेदारांच्या बैठकी होत असत.

मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणांहून उत्तरेकडे जाण्यासाठी मुंबई-आग्रा हाच मार्ग होता. तो नाशिकहून जात असल्याने व प्रवासामधील दळणवळण अवघड व बिकट होते. त्यामुळे आवश्यक तितकाच लवाजमा घोडे, तलवारी घेऊन लढाईसाठी निघालेले सैन्य नाशिक येथील सरदार मंडळींकडून घोडे व तलवारी भाड्याने घेत असत. या व्यवहाराचे केंद्र नाशिक व प्रमुखांपैकी सरदार राजेबहाद्दर यांच्याकडून घेत असत. चित्रमंदिर थिएटरचे सुरूवातीचे नाव श्री टॉकीज असे होते.

- Advertisement -

तळेकरांच्या मागील जागेत जेथे आता थिएटरचे स्टेज आहे, त्यालगत असलेल्या विहिरीत बांधकाम सुरू झाले, तेव्हा हजारो गंजलेल्या तलवारी त्यात सापडल्या होत्या. ब्रिटीश राजवटीत व विशेषत: जॅक्सनच्या वधाच्या वेळी त्या टाकल्या असाव्यात असे वाटते. नगरपालिकेशेजारील राजेबहाद्दर वाड्यात असलेली अंधेरी विहीर व सरस्वती काठी सय्यद बाबांची दर्गा आहे. या वाड्यात नाशिकच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीची शारदा मंदिर या नावाने १९४६ ला पेशवे वाडा पेठे विद्यालयात सुरू केलेली मुलींची इंग्रजी शाळा स्वतंत्रपणे वाड्यात स्थलांतरित झाली. राजेबहाद्दर वाड्यासमोरील एका ओट्यावर साळी नावाचे गृहस्थ पुस्तकांचे गले बांधून आणून तेथे विक्री करत असत. ते विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करीत असत. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्याने अभ्यास कोठल्या पुस्तकाच्या आधारे करावा, हेदेखील सुचवित असत. त्यामुळे शिक्षकांकरवी विद्यार्थ्यास वर्गात विचारपूस केली जाई, तेव्हा शिक्षकांचा रोष विद्यार्थ्यांना पत्करावा लागे.

हे काहीही असले तरी साळी हे विद्यार्थ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते. सारडा बंधूंच्या देणगीद्वारे विकसित झालेले मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर, टिळकपथ, नेहरू उद्यानासमोर वैभवात उभे आहे. चित्रमंदिर व विश्रामबागेपर्यंत जेथे आरती डिस्ट्रिब्युटर्सचे संकुल आहे तेथे भुयार होते. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न तरूणपणी प्रभाकरपंत वैशंपायन व माधव काळे यांनी केला होता. त्यात मध्यभागी अनेक हाडांचे सांगाडे आढळल्याने पुढील प्रयत्न त्यांनी सोडला. त्या प्रचंड नाल्यावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार झाला.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -