घरमहाराष्ट्रनाशिकरानमेव्यातील रोजगाराच्या संधीला अजूनही प्रतिक्षाच

रानमेव्यातील रोजगाराच्या संधीला अजूनही प्रतिक्षाच

Subscribe

आदिवासी भागातील महिला बचतगटांना प्रशिक्षणाची गरज

राकेश हिरे , कळवण : नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा तालुक्यांचा भाग नैसर्गिक सौंदर्यानी, डोंगरदर्‍यांनी आणि जंगलांनी नटलेला असून या भागातील डोंगरात आणि जंगलात. विविध प्रकारच्या रान वनस्पती, फळे, फुले वर्षभरात मिळत असली तरी रानमेव्यातील व्यवसाय आणि रोजगार संधी दुर्लक्षित राहिल्याने रानमेव्यातील रोजगार संधीला शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

आदिवासी भागात तिथल्या कलेला जितकी मागणी असते तितकीच मागणी डोंगरदर्‍यातील रानमेव्याला असते. या रानमेव्यातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, पण प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्षच होताना दिसते.डोंगरदर्‍यात आणि रानावनात विविध प्रकारच्या रान वनस्पती, फळे, फुले वर्षभर मिळतात. आदिवासी लोक त्याला रानमेवा म्हणतात. या मेव्याविषयी आपणही अनकेदा वाचले असेल. कधी तो चाखलाही असेल. हा रानमेवा विविध फळे, त्यांच्या बिया, मोहोर आदींच्या स्वरुपात असतो. या परिसरातील आदिवासी चरितार्थ चालवण्यासाठी जंगलातून हा मेवा गोळा करतात आणि बाजारांत नेऊन त्याची विक्री करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदल, अनियमित ऋतुमान या सगळ्यांचा रानमेव्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळेच हा वारसा जपणे अत्यंत आवश्यक आहे.

- Advertisement -

महिला बचतगटाच्या माध्यमातून रानमेव्याची संघटित विक्री केल्यास लाखोंची उलाढाल होऊ शकते. चांगले उत्पन्नही मिळू शकते. यामुळे अनेक महिला स्वावलंबी होऊ शकतात. गावठी रानमेव्याला विशेष मागणी असल्याने या पट्ट्यातील अनेक आदिवासी बांधवांना दुर्मीळ आणि औषधी वनस्पतींची माहिती असते. वसंत ऋतूत फुलणार्‍या अनेक वनस्पतींपासून आयुर्वेदिक औषधी बनतात. त्यांचा वर्षभर चांगल्या प्रकारे वापर करता येतो. काही आदिवासी बांधव वसंत ऋतुमध्ये औषधी वनस्पतींचे वाटे गोळा करून ठेवतात. आंबा आणि कोय, करवंदे, आवळा, अडुळसा, कोरफड, मोहाची फुले आदी साठवून ठेवतात. त्याचे वैद्यकीय उपयोग आहेत. ताप, कावीळ, डायबिटिस आणि त्वचा रोगांसाठी रानमेव्यातील अनेक फळे रामबाण उपाय आहेत. या औषधी गुणधर्माकडे लक्ष देऊन रानमेव्याच्या विक्रीसाठी काही ठोस धोरणे आखणे गरजेचे आहे.

फळांपासून घरगुती पदार्थ

डोंगरदर्‍यात उपलब्ध असणार्‍या रानमेव्यातील फळांपासून घरगुती खाद्यपदार्थ तयार करता येतात. आदिवासी महिला बचतगटांना त्याचे प्रशिक्षण दिल्यास येथील कुटुंबांसाठी हा मोठा उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो. त्यातून चांगले उत्पन्न व व्यवसायाच्या संधी तयार होतील. रानमेवा आणि एकूणच या सगळ्या जंगलसंपत्तीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होऊ शकतात.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -