घरताज्या घडामोडीपदाधिकार्‍यांमधील हमरीतुमरीने ‘साजरा’ झाला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन

पदाधिकार्‍यांमधील हमरीतुमरीने ‘साजरा’ झाला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन

Subscribe

कार्यक्रमस्थळीच अनिता भामरे, महेश भामरे यांचा रंजन ठाकरेंशी वाद

नाशिकlराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आमंत्रण न दिल्याचा दावा करत पक्षाच्या महिला शहराध्यक्षा अनिता भामरे व त्यांचे पती महेश भामरे यांनी विद्यमान शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना भर कार्यक्रमातच जाब विचारला. या वादाचे पर्यवसान हमरीतुमरीत होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. बुधवारी (दि. १०) घडलेल्या या प्रकाराबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे भामरे दांपत्याने सांगितले. दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन येथे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करोनाचा वाढता संसर्ग बघता सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी मोजक्याच पदाधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होते. याकरिता एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी सर्व पदाधिकार्‍यांना मेसेज, तसेच मोबाइलवर याविषयीचे निरोप पाठवण्यात आले होते. मात्र, आपण महिला शहराध्यक्ष असूनही आपल्याला या कार्यक्रमाबाबत कळविण्यात आले नसल्याचा दावा संतप्त झालेल्या अनिता भामरे यांनी
कार्यक्रमस्थळीच केला.
काय घडले कार्यक्रमस्थळी?
कार्यक्रम सुरू असताना भामरे राष्ट्रवादी भवन येथे पोहोचले. यावेळी अनिता भामरे यांनी आपणांस सतत डावलले जात असल्याचे सांगत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्याबाबत भुजबळ यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. महेश भामरे हेदेखील प्रदेश कार्यकारिणी सदस्य असल्याने त्यांनीही ठाकरेंविरोधात तक्रार केली. मात्र, विनाकारण आपणावर आरोप केले जात असल्याचा राग येऊन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी महेश भामरे यांना सुनावले. मात्र, हा वाद हमरीतुमरीपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. हा वाद इतका पराकोटीला गेला की, भामरे आणि ठाकरे एकमेकांवर धाऊन गेल्याचेदेखील समजते. पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र, यावरून राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.

पक्षाचे नेते शरद पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले. मात्र, स्थानिकांकडून महिला पदाधिकार्‍यांना डावलण्यात येते. मी शहराध्यक्ष झाल्यापासून सातत्याने मला विविध कार्यक्रमांना डावलले जाते. पक्षाच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नाही. वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकार्‍यांना आमंत्रित केले गेले. मात्र, मला याबाबत कळविण्यातही आले नाही. पक्षात होत असलेल्या अन्यायाबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.
– अनिता भामरे, शहराध्यक्षा,
राष्ट्रवादी महिला काँग्रेस

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -