घरक्राइमतोतया नागासाधूंचा आशीर्वाद पडला महागात; दोघांच्या सोनसाखळया लंपास

तोतया नागासाधूंचा आशीर्वाद पडला महागात; दोघांच्या सोनसाखळया लंपास

Subscribe

नाशिक : कारमधून शहरात वावरणार्‍या नागासाधूच्या वेशातील चोरांनी बुधवारी (दि.२४) साथीदारांच्या मदतीने म्हसरूळ आणि त्या पाठोपाठ गोविंदनगर परिसरात दोघा वृद्धांना ‘आशीर्वाद’ देण्याच्या बहाण्याने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या साधूंच्या वेशभूषेतील व्यक्तीसह साथीदारांनी संमोहित करून गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळून गेल्याचे फसवणूक झालेल्यांनी सांगितले. भरदिवसा सकाळच्या सुमारास अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरात या दोन्ही घटना घडल्याने शहर पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत या कारचा शोध न लागू शकल्याने पोलिसांची सतर्कता अन् गस्तीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, बुधवारी (दि. २४) सकाळी साडेसहाच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या एका महागड्या कारमधून नागासाधू एक महिला आणि अन्य एका पुरुष साथीदारासह शहरात देवदर्शनासाठी आल्याचे कारण सांगत वावरत होते. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धांवर त्यांची नजर होती. एकट्यात चालणार्‍या वृद्धांना थांबवून ते पंचवटी, त्र्यंबकेश्वरला जाण्याचा पत्ता विचारून सावज हेरत होते. अशातच चोरट्यांनी पहिले म्हसरूळच्या ओमकारनगर येथे एका आश्रमाजवळ भगीरथ रामचंद्र शेलार (वय ६९, रा. शिवाजीनगर, दिंडोरीरोड, नाशिक) यांना थांबवले. त्यांच्याजवळ कार उभी केली. कपाळाससह संपूर्ण अंगावर भस्म लावलेले अन् गळ्यात रुद्राक्षाच्या मोठमोठ्या माळा, डोक्यावर केसांचा अंबाडा बांधलेला, विवस्त्र अशा साधू महाराजांना बघून शेलार यांनीही आदराने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा या साधूच्या वेशातील संशयिताने त्यांना त्र्यंबकेश्वर, पंचवटीकडे जाण्याचा रस्ता विचारला. यानंतर आशीर्वाद देण्याचा बहाणा करताना शंभरची एक नोट आणि रूद्राक्ष त्यांच्या हाती देत चकित केले. हे करताना त्यांनी शेलार यांची नजर चुकवत गळ्यातील गणपतीचे लॉकेट लावलेली १२ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून कारमधून धूम ठोकली.

- Advertisement -

त्यानंतर हे सर्व संशयित आपल्या कारने उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोविंदनगरकडे आले. तेथेही त्याने पादचारी वृद्धांवर नजर रोखली. गोविंदनगरवासिय उत्तम परदेशी (वय 75) यांना कारमधील संशयितांनी थांबवले. कारमध्ये ड्रायव्हरशेजारी नागासाधूचा वेश धारण करून बसलेल्या व्यक्तीने वृद्धांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. तेव्हा परदेशी यांनी त्यांचे चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता साधूबाबाने आशीर्वाद देण्याचा बहाणा करत पुन्हा एकदा पहिल्या घटनेप्रमाणे रुद्राक्ष आणि ५० रुपयांची नोट त्यांच्या हाती चमत्कारीकरित्या ठेवली. मात्र, परदेशी यांच्या डोक्यावर हात ठेवत असताना त्यांना काहीसे अस्वस्थ वाटले. त्यांना चक्कर आल्यासारखे वाटले. अशास्थितीत साधूबाबांच्या वेशातील संशयितांनी लागलीच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन घेऊन पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍या कैद झाला आहे. यात तीन ते चार जणांची टोळी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु, हे चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने सीसीटीव्ही फुटेजवरूनही माग का लागत नाही, असा प्रश्न तक्रारदारांकडून उपस्थित केला जातोय. याप्रकरणी म्हसरूळ व मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात नागा साधूविरुद्ध जबरी लूट व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -