घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा; मागणीत मोठी वाढ

नाशकात दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा; मागणीत मोठी वाढ

Subscribe

नवीन नाशिक : लसीकरणानंतर रक्तदानाचे घटलेले प्रमाण, दिवाळीच्या सुट्यांमुळे विद्यार्थी, कामगार, नोकरदार गावी गेल्याने रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या यामुळे शहरातील बहुसंख्य रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्त व रक्तघटकांच्या मागणीचा पुरवठा करताना रक्तपेढ्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. डेंग्यूचे वाढलेले रुग्ण, त्यामुळे प्लेटलेट्सची मागणी वाढली असून दिवाळीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडल्याने रक्ताच्या मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये सध्या एक ते दोन दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक असून, रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्यामुळे ही तफावत अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या शस्रक्रिया,अपघात,डेंग्यू व अन्य कारणांनी रक्ताची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांकडे रक्ताची मागणी वाढलेली आहे.

- Advertisement -

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाशिककर शहराच्या बाहेर गेलेले आहेत,त्याशिवाय दिवाळी सुट्ट्यांमुळे महाविद्यालये,औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या घटलेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ऐच्छिक रक्तदात्यांच्या रक्तदानावरच रक्तपेढ्यांची भिस्त आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले असले तरी शहरात ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या देखील पुरेशी नाही. त्यामुळे सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई आहे. रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे नातेवाइक वाद घालतात,त्यातून गैरसमजही निर्माण होतात. रक्तदान झाल्याशिवाय रक्त उपलब्ध होऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नाशिककरांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

रक्तपेढ्यांची देवाण-घेवाण बंद

शहरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांकडून रक्तातील विविध घटकांची देवाण-घेवाण केली जाते. त्यामुळे गरजूंना वेळोवेळी रक्त किंवा रक्तघटक उपलब्ध होत होते. मात्र, रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने ही देवाणघेवाणही थांबली आहे. एका रक्तपेढीने दुसर्‍या रक्तपेढीकडे मागणी नोंदवल्यास ’बदल्यात दाता द्या,’ अशी मागणी होत आहे. ’प्लेटलेट’ आणि लाल पेशींसह संपूर्ण रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तपेढ्यांसमोरील अडचणींचा डोंगर वाढला आहे.

- Advertisement -
वर्क फ्रॉम’चाही फटका ?

दोन वर्षांपासून शहरात करोनाच्या संसर्गामुळे अनेक कंपन्यांचे कर्मचारी ’वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे मागच्या काळातही कंपन्यांमध्ये होणार्‍या रक्तदान शिबिरांची संख्या घटली होती. त्यात फारसा बदल झालेला नसल्याने औद्योगिक क्षेत्रात होणार्‍या रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यानेही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था,मंडळे यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

रक्ताची मागणी पूर्ण करणे हे रक्तपेढीचे कर्तव्यच आहे. मात्र, दिवाळीनंतरच्या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्ताच्या तुटवड्याची समस्या निर्माण होत असते. पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण होत असल्याने या काळात रक्तदानाची संख्यात्मक वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येणे आवश्यक आहे. : डॉ. शौचे, जनकल्याण रक्तसंकलन केंद्र, नाशिक

दिवाळी सुट्ट्या व तद्नुषंगिक कारणांनी रक्ताची मागणी व पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होते. दरवर्षी दिवाळीच्या काळात ही अडचण निर्माण होत असते. ऐच्छिक रक्तदान हा त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी अधिकाधिक सामाजिक संस्था, मंडळांनी रक्तदानवाढीसाठी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. : डॉ. पुरुषोत्तम पुरी, विभागीय रक्तपेढी अधिकारी, संदर्भसेवा रुग्णालय,नाशिक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -