घरमहाराष्ट्रनाशिककश्यपी धरण क्षेत्रात टवाळखोरांचा उच्छाद

कश्यपी धरण क्षेत्रात टवाळखोरांचा उच्छाद

Subscribe

गिरणारे पश्चिम पट्ट्यातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरणाचा परिसर दिवसेंदिवस अतिशय संवेदनशील बनत चालला आहे. अतिउत्साही व मद्यपी टोळ्यांचा वावर परिसरात वाढल्याने दुर्दैवी घटनांचा आलेखही चढू लागला आहे.

गिरणारे पश्चिम पट्ट्यातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरणाचा परिसर दिवसेंदिवस अतिशय संवेदनशील बनत चालला आहे. अतिउत्साही व मद्यपी टोळ्यांचा वावर परिसरात वाढल्याने दुर्दैवी घटनांचा आलेखही चढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध निर्देशित करणारे फलक बसविण्यात आले आहेत. मात्र, आजघडीला टवाळखोरांनी या फलकांचीच नासधून केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.

कश्यपी धरण कायमच शहरी पर्यटकांनी फुललेले असते. डोंगरी भागात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कश्यपी धरणाच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. मांसाहार व ताजे मासे तसेच हौशी पर्यटकांसाठी इथे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. हवेशीर, निवांत, रम्य परिसर म्हणून मौजेसाठी अनेकजण याठिकाणी येतात, मात्र अलिकडे या भागात उत्साही व टवाळखोर यांचाच मुक्त वावर वाढल्याने हा परिसर अधिक धोकादायक व संवेदनशील बनला आहे. धरण परिसर कचरामुक्त असावा, मात्र या ठिकाणी तर प्लास्टिक पाऊच अन् बाटल्यांचा खचच पडलेला दिसून येतो. मद्याच्या काचेच्या बाटल्याही रस्त्यावर बिनधास्त फोडल्याचे दिसून येते. कित्येक अतिउत्साही व्यक्ती, युवक, तसेच मद्यपी या ठिकाणी बुडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अतिप्रसंग, बलात्काराच्या घटनाही या भागात घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याला कुठंतरी आळा बसावा म्हणून धरण परिसरात धोकादायक ठिकाणी प्रतिबंध करणारे फलक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व हरसूल पोलीस ठाण्याकडून लावण्यात आले आहेत. परंतू, आजघडीला या फलकांची मोडतोड करण्यात आल्याचे आढळले आहे. हा प्रकार टवाळखोरांकडून केला जात असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज धोंडेगाव व कश्यपनगरच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

जागा देणार्‍या शेतकर्‍यांना अद्याप न्याय नाही

धोंडेगाव परिसरातील कश्यपी धरणाचा परिसर कायमच गर्दीने फुललेला असतो. हा आदिवासी भाग असून, वाढत्या पर्यटनाचा आम्हाला फायदा होत नसून, धरणासाठी जागा देणार्‍या शेतकर्‍यांना अद्याप न्याय मिळालेला नाही वा प्रकल्पग्रस्तांनाही नोकर्‍या मिळाल्या नाहीत. अशा स्थितीत टवाळखोरांचा वाढता उच्छाद आणि मद्यपींचा वावर परिसरातील मुली व महिलांसाठी असुरक्षिततेची बाब आहे. याठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला पत्रही दिले आहे. – सोमनाथ बेंडकोळी, रहिवासी, धोंडेगाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -