घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या परंपरांचा प्रारंभबिंदू "वाकडीबारव"

नाशिकच्या परंपरांचा प्रारंभबिंदू “वाकडीबारव”

Subscribe

ऐतिहासिक कालखंडात मुस्लिम राजवटीत मुस्लिम वस्ती विशेषत: नाशिकच्या दक्षिणेकडील भागात स्थिरावली. नाशिकला खर्‍या अर्थाने मोठेपणा, सौंदर्य, सुबत्ता मिळाली ती पेशवे (मराठा) काळात, हे सत्य नाकारता येणार नाही. जुन्या नाशिकचा उल्लेख मुस्लीम नाशिक व मराठा नाशिक अशा नावाने सापडतो. मुळात नाशिक सांज टेकडीवर बसलेले गाव. या टेकडीचे निसर्गत: नऊ टेक (शिखरे) म्हणून नवशिख असा पूर्वी उल्लेख होत असे. जुनी गढी, नवी गढी, जोगवाडा किंवा जोगीडोंगर, पठाणपुरा किंवा कोकणीटेक, म्हसरूळ टेक, डिंगरआळी किंवा टेक, महालक्ष्मी (सोनार) टेक, गणपती टेक आणि चित्रघंटा टेक या नावाने नऊ टेकांची ओळख होती. गावाला तटबंदी नव्हती. परंतु, गावात प्रवेश करण्यासाठी भगूर वेस, दरबार-परवाजा, काझीपुरा वेस, त्र्यंंबक दरवाजा, आसराची वेस, केतकी वेस जुन्या वस्तीत, तर नव्या वसाहतीत हत्ती वेस, मल्हार दरवाजा, सती वेस या वेशी व दरवाजे होते.

वाकडी बारव, राजवाडा नाशिक गावाच्या चतु:सीमेवरील दक्षिणेकडचा भाग. या बारवेपासून काही अंतरावर हद्द संपत असे. दक्षिणेकडून गावात प्रवेश करताना पुणे-मुंबई येण्या-जाण्याचे दोन मुख्य रस्ते आताच्या द्वारका सर्कलपासून समोर महालक्ष्मी चाळ, दादाजी महाल येथून वाकडी बारवेकडून दुसरा रस्ता विकसित झाला. तो रेणुका बागेसमोरून जियाउद्दीन मिलवरून वाकडी बारवेजवळ मूळ रस्त्यास मिळत असे. निसर्गत: या रस्त्याच्या संगमावर जिवंत पाण्याचा प्रवाह असलेली विहीर होती. या भागातील रहिवासी तिचा वापर करत. कालांतराने विहिरीचे दगडी बांधकाम करण्यात आले. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या बांधण्यात आल्या. विहीर ‘वाकडी बारव’ या नावाने ओळखली जावू लागली. आजतागायत हेच नाव कायम आहे, हेदेखील विशेष.

- Advertisement -

या बारवशेजारी प्रशस्त व्यासपीठासारख्या दगडी ओट्याचे बांधकाम होते. आजूबाजूस भाजीपाला, धान्य विक्री या भागातील शेतकरी मंडळी करत असत. बारवेवरून पाणी नेताना महिलांना उपद्रव करणार्‍यांना चोप देण्यासाठी तरुण मंडळी ठाण मांडून बसत. अपभ्रंश म्हणून या चौकास (चोप देणारी मंडळी वा चौक) असा करत. निवृत्तीराव वझरे यांनी पुढाकार घेऊन नाशिकचे देशभक्त वसंतराव नाईक यांच्या हस्ते चौक मंडई हे नामांतर केले. तेदेखील आज कायम आहे.

टिळक-परांजपे यांच्यापासून प्रेरणा घेऊन परकीय सत्तेविरूध्द लढण्यासाठी काही तरूणांनी राष्ट्रभक्त समूह ही संस्था १८९९ मध्ये स्थापन केली. मात्र, संस्था गुप्त ठेवली तर लोकांना सहभागी कसे करून घेणार यास्तव व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रेरणेमुळे १ जानेवारी १९०० ला स्वातंत्र्य आंदोलनात तरूण मंडळींनी सैनिक बनून सक्रिय व्हावे, या उदात्त हेतूने या संस्थेचे रूपांतर मित्रमेळा नावाने केले. यातूनच क्रांतिकारी विचारासाठी मित्रसमाज स्थापन झाला. १९०१ मध्ये पुण्याप्रमाणे नाशिक येथे अनुकरण करून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली. शिवजयंतीदेखील उत्साहात साजरी करण्यात येऊ लागली. युवकांच्या उत्साहाला उधाण आले. गणेशोत्सव धार्मिक म्हणून तर होताच आणि शिवजयंती महान व्यक्तीचे पुण्यस्मरण होतेच परंतु, देशभक्तीचे धडे देण्याच्या उद्देशाने उत्सव मुख्यत्वे साजरे होऊ लागले. तो इतिहास पुढे येईलच. पूर्वी शिवजयंतीची मिरवणूक १४ मे १९०७ ला पंचवटीतील मुठे पागेजवळून निघून व विजयानंद नाट्यगृहात येत असे.

- Advertisement -

१९२५ मध्ये प्रथम स्वातंत्र्यसैनिक देशभक्त दादासाहेब गद्रे यांच्या पुढाकाराने नाशिकमधील सर्व गणेशोत्सव मंडळींची एकत्रित मिरवणुकीची प्रथा सुरू झाली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, शाह छत्रपती बोर्डिंग व मेहतर समाजाच्या गणपतींनादेखील सहभागी करून घेतले गेले. मिरवणुकीच्या प्रारंभाचे स्थळ म्हणून वाकडी बारव (चौक मंडई) या ठिकाणाची निवड करण्यात आली. आजही ही प्रथा सुरू आहे. नाशिकमधील सर्वधर्मियांच्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ येथूनच होतो. जुन्या नाशिकमधून रंग भरलेल्या टोपांच्या गाड्यांची मिरवणूक जुन्या नाशिकमधून अनेक वर्षे नागरिकांवर विविध रंगांचा वर्षाव, गुलालाची उधळण करत जात असे ती याच भागातून. आता ही पद्धत बंद झाली आहे. परंतु, जुन्याकाळी अनेक आबालवृद्ध आनंदाने सहभागी होत असत.

नाशिकच्या बहुजन समाजाच्या जीवनात १९२५ चा काळ अतिशय मंतरलेला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामुळे बहुजन समाजाला नवे बळ मिळाले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाद्वारे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. १९३३-३४ मध्ये माळी-क्षत्रिय परिषद नाशिकला झाली. या परिषदेचे धुरिणीत्व जगन्नाथ मेहेर, पार्वताबाई बोरावके, फरांदे यांनी केले. या चौकमंडई विभागातील मुरलीधर भरवीरकर, लक्ष्मीबाई गायकवाड, चंद्रसेन गायकवाड यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी अथक प्रयत्न केले.

श्रावण महिन्यात त्रिरश्मी (पांडव) लेणे येथे तिसर्‍या सोमवारी यात्रा भरते. लक्ष्मी व रेणुकेचे दर्शन घेऊन या चौकातील बुरुड मंडळी सवाद्य मिरवणुकीने या यात्रेसाठी जात असत व दांडपट्टे, भाले, लाठी, बलाठी या खेळांबरोबरच रात्री बोहाड्याचा कार्यक्रम होत असे. या कार्यक्रमासाठी अलोट गर्दी जमत असे. या मंडळाचे नाव आहे ‘बिरबान आखाडा’. आजदेखील बिरबान आखाड्यात माळी व इतर समाजाची मंडळी ही परंपरा पाळत आहे. नाशिकच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचे ते आकर्षण आहे. वझरे, मोरे, दफ्तरे, हिरवे, दराडे, कमोद परिवार इतर सर्व समाजाला सामावून घेऊन या चौकात भव्य गणेशोत्सव साजरा करतात. नाथांचा जुना मठ या चौकात होता. तेथील जागेशेजारी दक्षिणमुखी मारूतीस भाविकांची गर्दी असते!

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -