घरमहाराष्ट्रनाशिकजलसंधारणाच्या योजना आणणार जलशक्ती अभियानांतर्गत आणणार

जलसंधारणाच्या योजना आणणार जलशक्ती अभियानांतर्गत आणणार

Subscribe

दुष्काळसदृश्य परिस्थिती व कमी होत जाणारी भूजल पातळीसाठी ठरणार उपयुक्त यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय

दुष्काळसदृश्य परिस्थिती व कमी होत जाणारी भूजल पातळी यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारमार्फत जलशक्ती हे अभियान राबविण्यास 1 जुलै पासून सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत जलसंधारण व जलसुरक्षा या बाबींकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती अणुउर्जा विभागाचे सहसचिव जयंत खोब्रागडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जलशक्ती अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, केंद्रीय पाणी व उर्जा संशोधन केंद्राचे वैज्ञानिक बी. आर. तायडे, लघुपाटबंधारे विभाग जि. प. कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रविण खेडकर, भूजल सर्वेक्षण उपसंचालक जीवन बेडवाल उपस्थित होते. पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंधारण व गंगा पुनरुत्थान या केंद्रीय विभागांना एकत्रित करुन जलशक्ती मंत्रालय तयार करण्यात आले आहे. जलशक्ती अभियानांतर्गत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, बीड व अहमदनगर या आठ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा, विंधन विहीर पुर्नभरण, वृक्षलागवड या कामांच्या माध्यमातून भूजल पातळीत वाढ करणे यावर लक्ष केंद्रीत जाणार असल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले.
जलसुरक्षा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, जलसंधारण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृदा विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वनविभाग, जलसंपदा विभाग यांच्या मार्फत सुरु असणार्‍या पाण्यासंदर्भातील योजनांच्या माध्यमातून जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वरील सर्व विभागांनी एकमेकांच्या समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जलशक्ती अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक माध्यमांचा वापर, प्रचार व प्रसिद्धीसाठी करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. सदर अभियानाच्या कामकाजासाठी विभागनिहाय नोडल अधिकारी यांची नेमणूकही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -