घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेच्या 'सुपर-50'चा निकाल सोमवारी; महाविद्यालयाचाही शोध सुरू

जिल्हा परिषदेच्या ‘सुपर-50’चा निकाल सोमवारी; महाविद्यालयाचाही शोध सुरू

Subscribe

नाशिक : अकरावी विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 50 विद्यार्थ्यांना दोन वर्षे मोफत शिक्षण देण्यासाठी रविवारी (दि.13) घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा निकाल सोमवार (दि.21) रोजी जाहीर होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा ‘सुपर 50’ हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. जिल्ह्यातील 15 तालुका केंद्रावर घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत 2 हजार 170 (67 टक्के) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील अनुसूचित जातीच्या (एससी) 25 विद्यार्थ्यांची तर अनुसूचित जमातीच्या (एसटी) 25 विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत शिक्षण दिले जाणार आहे. दोन वर्षासाठी हे निवासी शिक्षण मिळणार असून, आयआयटीसारख्या नामांकित संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापक त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील. यातून या विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास होईल तसेच आयआयटीसारख्या नामांकित संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळेल. निवड होणार्‍या विद्यार्थ्यांना निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई या पात्रता परीक्षेविषयी मोफत शिक्षण मिळेल. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात आली.

- Advertisement -
महाविद्यालयाचा शोध सुरु

‘सुपर 50’ विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर त्यांना निवासी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण मिळणार आहे. अशा महाविद्यालयाचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -