घरमहाराष्ट्रNawab Malik : कुठलीही राजकीय चर्चा नाही...; अजित पवार गटाची सावध भूमिका

Nawab Malik : कुठलीही राजकीय चर्चा नाही…; अजित पवार गटाची सावध भूमिका

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक हे आज, गुरुवारी विधानसभेत उपस्थित होते. पण ते थेट सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे वादळ उठले आहे. त्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी जोरदार टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित यांना पत्र लिहून नवाब मलिक यांच्या सत्तेतील सहभागावर आक्षेप घेतला. परिणामी, अजित पवार गटाने देखील सावध भूमिका घेत, नवाब मलिक यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका…..देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांना पत्र

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे विधानसभेत सत्ताधारी बाकांवर बसले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षात असलेल्या भाजपा तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी तसेच अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांचा देशद्रोही असा उल्लेख केला होता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिक यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते; पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : फडणवीसांचे पत्र म्हणजे महायुतीमध्ये वादाची सुरुवात नाही तर…; वडेट्टीवारांचा दावा

त्याला आता अजित पवार गटाने उत्तर दिले असले तरी, सावध पवित्रा घेतला आहे. आमदार नवाब मलिक हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. मधल्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली होती. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. गुरुवारी विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे, अशी सारवासारव अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. जवळपास 18 महिने कारागृहात काढल्यावर 11 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर, 15 ऑगस्टला अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्याबद्दलचा खुलासा तटकरे यांनी केला आहे.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल; फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादीची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -