घरसंपादकीयओपेडकुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई!

कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई!

Subscribe

किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचं आणि घर सोडून पळून जाण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच पालकांना या वयातील मुलांची चिंता भेडसावते, पण केवळ चिंता करत बसण्यापेक्षा आपल्या पालकत्वाच्या चष्म्याच्या काचा बदलल्या तर तुमचं पिल्लू चुकीचं वागत नाही याची जाणीव होईल.

विचारांनी सारं कसं गलबलायला होतं
अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं..
नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन
कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे घण…
मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई !

संदीप खरे यांच्या या गीताचा अनुभव सध्या घराघरात येतोय. बालपणाला मागे सारत किशोर होणारी मुलं- मुली हा आज चिंतेचा विषय बनत चाललाय. या वयातल्या मुला-मुलींचं घर सोडून पळून जाण्याचं आणि आत्महत्येचं प्रमाण बघितलं तर काळजात खुट्ट होतं. खरं तर आपल्या देशात पौगंडावस्थेतील म्हणजेच किशोरवयीन मुलांचं प्रमाण लोकसंख्येच्या २१.८ टक्के आहे, म्हणूनच या किशोरवयीन मुलांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य आपल्या देशाचे भवितव्य ठरवतं, पण इन्स्टाग्राम आणि स्नॅप चॅटवाल्या या पिढीकडे पालकांचा बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होत आहे. त्यातून वेगवेगळ्या समस्यांचा जन्म होतो. भारतात दर तासाला एक किशोरवयीन विद्यार्थी आत्महत्या करतो.

- Advertisement -

मुलांच्या आत्महत्येच्या कारणात कौटुंबिक समस्या, शारीरिक व भावनिक आजार, शाळेतील अपयश, प्रेम प्रकरणं, ड्रग्ज आणि लैंगिक अत्याचार अशी अनेक कारणे दिसतात. भावनिक आजारात या वयोगटातील मुलांमध्ये आजकाल निराशा तसेच चिंता यांचे प्रमाण फारच वाढलेलं दिसून येतं. या काळात मुलांच्या मेंदूत जिथंं भावना निर्माण होतात, ते लवकर विकसित होते, परंतु भावनांवर नियंत्रण ठेवणारे जे मेंदूतील स्थान असतं, ते पूर्णपणे विकसित व्हायला वेळ लागतो. त्यामुळेच ही मुलं बिकट परिस्थितीला किंवा आव्हानांना भावनावश होऊन प्रतिक्रिया देतात.

नेमकं याच वयात मुलं स्वत:ला खूप मोठी समजायला लागतात. ती आपली स्वतंत्र मतं मांडण्यास सुरुवात करतात. आजवर आई-वडील, शिक्षक यांच्या विचारांनी वागणार्‍या मुलांना, आपल्याला चांगलंच कळतं असं वाटू लागतं. मोठ्यांनी सांगितलेलं खरं असतंच असं नाही, हे त्यांना समजतं. किंबहुना, आपल्याला पालकांपेक्षा जास्त कळतं, अशा भावना मनात निर्माण होतात. त्यामुळे बर्‍याच बाबतीत आई-वडील-ज्येष्ठ किंवा शिक्षकांपेक्षा मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याकडे कल वाढतो. पण त्यांना लक्षातच येत नाही की आई-बाबांच्या दृष्टीनं मुलं मोठी कधी होतंच नाहीत. मूल वयानं कितीही मोठं झालं तरी आई-बाबांना ते पिल्लूच वाटतं. नेमका मानसिक गोंधळ इथंच होतो.

- Advertisement -

किशोर वयात मुलं स्वत:ला मोठी समजतात आणि आई-बाबा त्याला पिल्लूच असल्याची सातत्याने जाणीव करून देतात. बर्‍याचदा त्याला लहान मुलाप्रमाणं एकच-एक समजुतीच्या बाबी सांगण्याचा प्रयत्न होतो, पण मुलांना ती ‘कटकट’ वाटते. कधी कधी पालक एवढा आवाज चढवतात की केवळ बंडखोरी म्हणून मुलं त्यांचं ऐकत नाहीत. अशा वेळी ते बर्‍याचदा आई-वडिलांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या मनोवस्थेचा विचार करूनच आपल्याला सूचना द्यायला पाहिजेत. खरं तर पालकांनी हे समजून घ्यावं की, ऑफिसमध्ये आपल्या वरिष्ठाने एकच-एक सूचना आपल्याला वारंवार केली, तर आपला त्रागा होतोच ना? मग मुलांच्या बाबतीत तसा विचार का केला जात नाही? मुलांवर खापर फोडण्यापूर्वी आपण त्याच्याशी किती संवाद साधतो? त्याला किती वेळ देतो? त्याचा मूड कसा आहे? हे समजून घेतो का? मुलं पालकांच्या सूचनांना हलक्यात घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे बर्‍याचदा पालक केवळ सूचना करायची म्हणून करतात.

त्याला कोणताही आधार नसतो. पालकांनी सूचना करण्यापूर्वी त्या सूचनेविषयी आपण किती जागरूक आहोत याचेही आत्मपरीक्षण करायला हवं. केवळ ‘अभ्यासाला बस’ अशी सूचना दिली, तर मुलं त्याकडे दुर्लक्षच करतात, पण कोणता अभ्यास? शाळेत कोणता धडा चालू आहे? अभ्यास क्लासचा करायचा आहे की शाळेतला? गृहपाठ आहे की रिव्हिजन? प्राधान्य कशाला द्यायचं? म्हणजेच अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? याचा अभ्यास पालकांचा असला पाहिजे. म्हणजे मग त्यांच्या सूचनेला महत्व येतं. वर्कोहोलिक पालक कुटुंबासाठीच काबाडकष्ट उपसतात हे खरं आहे, पण तरीही घरातील किशोरवयीन मुलांच्या भावनिक गरजांकडे होणारं त्यांचं दुर्लक्ष ही भविष्यातील संकटांची चाहूल समजावी. अशा वेळी ही मुलं बाहेर कुठं आधार शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून मग चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं.

इथं पालकांनी लक्षात घ्यायला हवं की, किशोरवयीन मुलं ही अधिक भावनिक असतात. कोणत्याही मोहात ती सहज अडकतात. लहानसहान गोष्टींवरून चिंतातूर होतात किंवा संताप व्यक्त करतात. या वयात मुलं अधिक साहसी, बेधडक आणि निर्भय असतात. संकटांना आणि गहन प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती असते. धोक्याचं मोजमाप करून, तो पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास पूर्ण झालेला नसल्यानं या वयात चुका होण्याचं प्रमाणही जास्त असतं. गेल्या महिन्यात ललित पाटील एमडी ड्रग्जचे जे प्रकरण पुढे आलं, त्यात किशोरवयीन मुलांकडूनच अशा जीवघेण्या ड्रग्जची विक्री केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. कमी श्रमात जास्त पैसा मिळण्याचं साधन या दृष्टीनं मुले अशा अ्रनैतिक गोष्टींकडे आकर्षित होतात. म्हणून या काळात मुलांना अधिक सांभाळणं गरजेचं आहे.

आईनं मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आत्महत्या केली किंवा घर सोडलं अशा बातम्याही आजकाल रोजच वाचायला मिळतात. मुलांच्या हातात मोबाईल दिला तर त्यातून काही अघटित होण्याची भीती पालकांच्या मनात असते. मोबाईल वा इंटरनेटचा दुरुपयोग झाला, तर समाजाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे विचार पालकांच्या मनात येत राहतात. त्यामुळे ते मुलांना मोबाईलपासून अधिकाधिक लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. पालकांची काळजी अनठायी आहे असेही नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल इन्व्हेस्टिगेशन अँड न्यूरोसायन्सच्या अहवालानुसार, भारतातील ७३ टक्के मुले मोबाईल वापरतात. यापैकी ३० टक्के मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.

१० पैकी ३ मुले नैराश्य, भीती, चिंता आणि चिडचिडेपणाने ग्रस्त आहेत. त्यामुळे पालक मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यासाठी मुलाच्या हातून मोबाईल हिसकावून घेणं हा उपाय रामबाण ठरत नाही. त्यासाठी मुलांच्या कलानं घेणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो. किशोरवयीनांचा मेंदू प्रत्येक गोष्टीतून निखळ आनंद उपभोगण्यास उत्सुक असतो. प्रत्येक गोष्टीची त्यांना परिपूर्ण माहिती हवी असते. पालकांसोबत त्यांचे संबंध सलोख्याचे असतील, तर त्यांच्याकडून ते माहिती गोळा करतात; पण या वयात त्यांच्यातील शारीरिक आणि लैंगिक बदलांमुळे त्यांचं मुख्य आकर्षण असतं लैंगिक माहितीबाबत. त्या बाबतीत पालकांशी बोलण्यास ते घाबरतात. मग ही सगळी माहिती कुठून मिळवायची, तर आता सहज उपलब्ध असलेल्या ‘इंटरनेट’वरून.

दोघेही पालक नोकरी करणारे असतील, तर एकट्या राहणार्‍या मुलांकडे खूप कोवळ्या वयात ‘मोबाईल’ येतो. तिथूनच समस्या निर्माण होतात. शाळांची ‘असाईनमेंट’ही ‘इंटरनेट’वर पाहून करायची, असे म्हणता म्हणता ही मुले कधी वेगवेगळ्या साईट्सकडे वळतात हे त्यांनाही कळत नाही. हल्ली मुलांच्या संगोपनातच मोबाईल आणि इंटरनेटचा मोठा वाटा आहे. बाळ जन्माला येतं, त्यानंतर वर्षभरातच त्याला मोबाईलवर अंगाई ऐकवायला सुरुवात केली जाते. ते जसजसं मोठं होतं, तसतसा त्याचा मोबाईलचा वापर वाढवला जातो. मोबाईलवर कार्टून दाखवल्याशिवाय ते खाणार नाही ही सवय पालकच तर लावतात. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो म्हणून ते मोबाईल मुलांच्या हातात सपूर्द करतात. त्याचा परिणाम मग भविष्यात भोगावा लागला, तर अशा वेळी मुलांना दोष देऊन काय उपयोग?

किशोरवयीन मुलांना पुस्तक वाचन करायला प्रवृत्त करणं, त्यासाठी त्यांना आवडतील ती पुस्तकं विकत घेऊन देणं, निसर्गरम्य ठिकाणी सहली काढणं, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणं अशा काही सवयी त्यांना मोबाईलच्या अति वापरापासून परावृत्त करू शकतात. दुसरीकडे या मुलांना आकर्षित करणार्‍या सोशल मीडियालाही पालक समजून घ्यायला तयार नसतात. इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅटचा वापर या वयात मोठ्या प्रमाणात का केला जातो याचं कारण पालकांनी समजून घेतलंय का? या वयातील मुले स्वतःला व भोवतालच्या जगाला समजून घेण्याचा, ताडून बघण्याचा व मर्यादा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना जगामध्ये आपले स्थान शोधायचे, ओळखायचे आणि निर्माण करायचे असते. त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण होऊ लागते व ती आत्मसन्मान राखण्याचा प्रयत्न करतात. ती स्वतःला व इतरांना ओळखण्याचा प्रयत्न करू लागतात.

त्यासाठी फेसबुकपेक्षा त्यांना इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचे व्यासपीठ अधिक सुकर वाटते, पण पालक अतिकाळजीने त्यांना या व्यासपीठापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात अतिकाळजी करणारे पालकही मुलांना आवडत नाहीत, पण पालक मुलांकडे दुर्लक्षच करू लागले, तर मुलं सोशल मीडियाचा वापर वाढवतात. आभासी गोष्टींकडे आकर्षित होण्याचं हे वय आहे. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचे व्यासपीठ आभासी गोष्टींना चांगलंच खतपाणी घालतं. यात वैयक्तिक फोटो आणि व्हिडीआेंच्या माध्यमातून सहजपणे फॉलोअर्स वाढवता येतात. फॉलोअर्सची वाढती संख्या हा या पिढीचा प्रतिष्ठेचा मुद्दा बनलाय. त्यात सगळी मुलं केवळ लफडी करण्यासाठीच या मीडियाचा वापर करतात हा गैरसमज फेसबुक पिढीतील पालकांनी आता काढून टाकायला हवा. केवळ तुमचीच मुलं नाहीत, तर जगभरातील ६० टक्के किशोरवयीन मुलं-मुली इन्स्टा आणि स्नॅपचॅटचा वापर करतात.

ही दोन्ही माध्यमे अतिशय स्वच्छ आहेत, असाही दावा कुणी करणार नाही, पण मुलांशी आपण गप्पा मारत राहिलो, तर त्यांना सोशल मीडियाची गरज वाटणार नाही. आई किंवा वडिलांपैकी एकाने मुलांशी इतकी जवळीक करायला हवी की मुलांना ते चांगले मित्र वा मैत्रीण वाटायला हवेत. त्यांचे सर्वच सिक्रेट त्यांनी विश्वासाने सांगायला हवेत. त्यांनी सांगितलेल्या बाबी जर पालकांनी चव्हाट्यावर मांडल्या, तर मुलांना तो विश्वासघात वाटतो. त्यातूनच मग पालकांप्रती नकारात्मक भावना निर्माण होते. या वयात विभिन्न लिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण ही बाब स्वाभाविक आहे हेदेखील पालकांनी समजून घ्यायला हवं. आपण किशोर वयात असताना आपल्याला अशी आकर्षणं नव्हती का? याचाही पालकांनी विचार करायला हवा. त्यामुळे यापुढे आपलं किशोरवयीन पिल्लू कुशीत नसल्याच्या विचारानं घाबरण्यापेक्षा त्याच्या आशा-अपेक्षांंना संवादाचे पंख लावून उडण्याचं बळ द्यावं, इतकंच.

कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -