घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीकडून आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे विधानपरिषदेवर

राष्ट्रवादीकडून आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे विधानपरिषदेवर

Subscribe

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त रिक्त जागेवर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे यांची निवड...

राष्ट्रवादी काँग्रेच्या युवती संघटनेच्या नेत्या आणि मुंबई संघटक आदिती नलावडे आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती होणार आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांपैकी राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर दोघांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची मुदत ६ जून २०२० रोजी संपत आहे. सहा महिन्यांसाठी आमदारकी असली तरी आदितीच्या रुपाने युवती संघटनेतील कार्यकर्ती तसेच शिवाजीराव गर्जे यांच्यामाध्यमातून कार्यालयीन पदाधिकाऱ्याला विधानपरिषदेवर संधी दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत.

कोण आहेत आदिती नलावडे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून आदिती नलावडे या संघटनेत कार्यरत आहेत. नलावडे यांनी परदेशात उच्चशिक्षिण घेतलेले आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. मात्र ऐनवेळी सुरेश माने यांना संधी देण्यात आली. ती कसर आता विधानपरिषदेच्या आमदारकीने पक्षाने भरून काढली आहे. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांच्याकडे डिजिटल प्रचाराची जबाबदारी दिली होती. तसेच मुंबईत विविध प्रश्नांवर त्यांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली आहेत.

- Advertisement -

कोण आहेत शिवाजीराव गर्जे?

शिवाजीराव गर्जे १९९९ पासून कार्यरत आहेत. माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे पक्षाचे प्रशासकीय कामकाज पाहतात. दिवंगत नेते गुरुनाथ कुळकर्णी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातील प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती.

आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात ७ जून २०१४ रोजी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असल्यामुळे दोन्ही पक्षांचे सहा सदस्य नियुक्त केले गेले होते. राष्ट्रवादीतर्फे विद्या चव्हाण, जग्गनाथ अप्पा शिंदे, प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, रामराव वडकुते आणि राहुल नार्वेकर यांनी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे या दोन्ही रिक्त जागेवर सहा महिन्यांसाठी आदिती नलावडे आणि शिवाजीराव गर्जे यांची निवड होत आहे. दोन दिवसांत दोन्ही सदस्यांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -