घरमहाराष्ट्रजळगाव राडा प्रकरण - 'भाजपला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आलं'

जळगाव राडा प्रकरण – ‘भाजपला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आलं’

Subscribe

जळगावच्या अंमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे.

बुधवारी संध्याकाळी जळगावच्या अंमळनेरमध्ये झालेल्या भाजपच्या मेळाव्यातला ‘फ्री स्टाईल’ राडा हा प्रकार म्हणजे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘भाजपमधलं फोडाफोडीचं राजकारण भाजपच्या अंगलट आलं आहे’, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी मारहाण झालेले भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ख्याती असलेले गिरीश महाजन त्यांच्याच जिल्ह्यात संकटात सापडल्याचं चित्र दिसून आलं आहे.

काय झाला होता प्रकार?

जळगावच्या अंमळनेरमध्ये बुधवारी संध्याकाळी भाजपच्या जिल्हा प्रतिनिधी-कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. यावेळी विद्यमान आमदार स्मिता वाघ यांच्या समर्थकांनी पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी देत त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आणि स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांनी थेट पाटील यांना लाथांनी मारण्यास सुरुवात केली. यातून मोठा गोंधळ उडाला. भाजपमधलेच दोन गट एकमेकांना मारहाण करण्यात व्यस्त झाले असताना पालकमंत्री गिरीश महाजनांनी मध्ये पडून वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. अखेर येनकेनप्रकारेण या दोन्ही गटांना शांत करून मेळावा सुरू करण्यात आला.

काय म्हणाले भुजबळ?

नाशिकच्या पालकमंत्र्यांना धक्काबुक्की झाली. बी. एस. पाटलांना मारहाण करण्यात आली. पण कुणीही कायदा हातात न घेता पक्षश्रेष्ठींनी चर्चा करणं गरजेचं आहे. अशा गोष्टी टाळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी विचार करायला हवा. भाजपनं राज्यभर फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. पण भाजपमध्येच झालेली फोडाफोडी त्यांच्या अंगलट आली आहे. अशा वेळी सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.

छगन भुजबळ, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisement -

काय आहेत पडद्यामागची गणितं?

यंदा बी. एस. पाटील यांनी खासदारकीच्या तिकिटासाठी मोठी तयारी केली होती. मात्र, तिकीट स्मिता वाघ यांना दिलं जाण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पाटील गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, पडद्यामागे काही घडामोडी घडल्या आणि ऐन वेळी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चिडलेल्या वाघ समर्थकांनी आणि खुद्द स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांनी आपली नाराजी अशा प्रकारे उघडपणे मारहाणीतून व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -