घरमहाराष्ट्रNilwande Dam : श्रेयवादाची लढाई? कोविड काळातही काम निर्णायक टप्प्यावर आणल्याचा मविआचा...

Nilwande Dam : श्रेयवादाची लढाई? कोविड काळातही काम निर्णायक टप्प्यावर आणल्याचा मविआचा दावा

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्‍या प्रमुख उपस्थितीत बुधवारी अहमदनगरमधील निळवंडे धरणातून (Nilwande Dam) कालव्‍यात पाणी सोडण्‍याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता यावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कोविडसारखी (Covid-19) गंभीर परिस्थिती असतानाही या धरणाचे काम निर्णायक टप्प्यावर आणल्याचा दावा मविआने केला आहे.

निळवंडे धरण प्रकल्पाला 1970च्या सुमारास मंजुरी मिळाली असली तर, सुरवातीच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला. 1993मध्ये निळवंडे धरण प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आणि 2023मध्ये तो पूर्णत्वास आला. शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. आपले सरकार स्थापन होण्यापूर्वी आधीच्या सरकारमध्ये एखाद्या प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली गेली, पण आम्ही 29-30 सिंचन प्रकल्पाला या सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

तर, ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात 400 ते 450 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मिळाले. तेही 2019 साली अर्थसंकल्पात आम्ही ते मंजूर केले होते. त्यानंतर काहीही पैसे या प्रकल्पाला देण्यात आले नाहीत. पण आपले सरकार आल्यानंतर याच्या कामाला गती देऊन रेकॉर्ड टाइममध्ये ते पूर्णत्वास आणले. यंदाच्या बजेटमध्ये सर्वाधिक पैसे गोसेपूरनंतर निळवंडे प्रकाल्पाला देण्यात आले आहेत, असा दावा करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याचे श्रेय आपल्या सरकारकडे घेतले.

मविआ म्हणते, धरणाचे निर्णायक टप्प्यावर आणले

नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ करण्यात आला ही आनंदाची बाब आहे. कोविडची भयंकर परिस्थिती असतानादेखील आम्ही न थांबता निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान वाटत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

सन 1970 ते 2019पर्यंत या धरणाच्या कामासाठी 1100 कोटी रुपये खर्च करून केवळ 45 टक्के काम पूर्ण झाले होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत जवळपास 900 कोटींचा निधी देऊन या धरणाचे 90 टक्के काम पूर्ण केले. जलसंपदामंत्री म्हणून धरणाच्या कामाला तीन वेळा भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. या पाण्याच्या मदतीने नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी शेतात मोती पिकवून या भागाचा कायापालट करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -