घरCORONA UPDATECoronaVirus: पंढरपूरच्या विठ्ठलाची कोरोनाग्रस्तांसाठी धाव; विठ्ठल मंदिराकडून १ कोटींची मदत

CoronaVirus: पंढरपूरच्या विठ्ठलाची कोरोनाग्रस्तांसाठी धाव; विठ्ठल मंदिराकडून १ कोटींची मदत

Subscribe

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसचे संकट देशभरासह राज्यात ओढावले असताना पंढरपूरचा विठ्ठल देखील कोरोनाग्रस्ताच्या मदतीला धाऊन आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय मदतीसाठी विठ्ठल मंदिरासाठी १ कोटी रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे घोषित करण्यात आले आहे. तसेच ४ एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा देखील रद्द झाल्याचे मंदिराकडून सांगण्यात आले असून वारकरी संप्रदायाकडून यापूर्वीच यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देखील मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

दर्शनासाठी मंदिर बंद, नित्यपुजा राहणार सुरु

मंदिर समितीने १७ मार्च ते ३१ मार्च अखेर श्री विठ्ठल –रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता १४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र, देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे.

पंढरीची चैत्र वारी रद्द

वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र या चार वारींना अनन्यसाधारण महत्व असते. यामध्ये चैत्र वारीसाठी दरवर्षी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून भाविक पंढरीत येतात. जवळपास ३ ते ४ लाख भाविकांची चैत्र वारीनिमित्त पंढरीत मांदियाळी जमत असते. परंतु कोरोना व्हायरसमुळे वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी चैत्र वारी रद्द करण्यात आली आहे. ४ एप्रिल रोजी या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -