घरमहाराष्ट्रमाझ्याकडे अनिल देशमुखांविरुद्ध खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत; परमबीर सिंह यांचं प्रतिज्ञापत्र

माझ्याकडे अनिल देशमुखांविरुद्ध खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत; परमबीर सिंह यांचं प्रतिज्ञापत्र

Subscribe

ईडी कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत असं प्रतिज्ञापत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर सादर केलं आहे. परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं याची पुष्टी त्यांच्या वकिलांनी केली आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर खंडणीवसुलीचा आरोप केला होता. यानंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांच्या एकसदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली होती.

या आयोगाला परमबीर सिंह यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केलं आहे. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्यावेळी आयोगासमोर सादर केलं आहे, असंही या वकिलांनी सांगितलं. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिलं आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असं हिरे यांनी सांगितलं. परमबीर या प्रकरणात उलट तपासणीसही तयार नसल्याचे हिरे यांनी नमूद केलं.

- Advertisement -

दरम्यान, परमबीर सिंह यांना चौकशीला गैरहजर राहिल्याने चांदीवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावलं आहे. तसंच, जामीनपात्र वॉरंट देखील बजावलं. मात्र, परमबीर हे अद्याप एकदाही चौकशी आयोगासमोर हजर झालेले नाहीत. आयोगाने सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल आतापर्यंत तीनवेळा परमबीर यांना दंड ठोठावला आहे.

अनिल देशमुखांना ईडी कोठडी

अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. देशमुख यांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी रात्री शिरा अनिल देशमुख यांना अटक केली.

- Advertisement -

अनिल देशमुख यांची मंगळवारी सकाळी जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली. अनिल देशमुखांना अटक करण्यात आलेले मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. देशमुख यांना मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुख यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले, असा दावा त्यांनी केला. ईडीने देशमुख कोर्टात १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ॲड. विक्रम चौधरी आणि ॲड. इंद्रपाल सिंग यांनी देशमुख यांच्याबाजूने कोर्टात युक्तिवाद केला. देशमुख यांचं वय झालं आहे. त्यांचा खांदा निखळलेला आहे. त्यामुळे त्यांना एक सहकारी देण्यात यावा. तसेच त्यांना घरचं जेवण देण्यात यावं. त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांना कोविडची बाधाही झाली होती.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -