घरमहाराष्ट्रविकेंडचा दि एण्ड

विकेंडचा दि एण्ड

Subscribe

बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी विकेंडसाठी बसने महाबळेश्वर सहलीसाठी निघाले होते. पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावालगतच्या आंबेनळी घाटात ही बस 300 फूट दरीत कोसळून ३३ प्रवासी दगावले आणि एकजण वाचले आहेत. काही क्षणांतच काळाने घाला घालून विकेंडचा शनिवारीच दी एण्ड केला

बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी विकेंडसाठी बसने महाबळेश्वर सहलीसाठी निघाले होते. पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावालगतच्या आंबेनळी घाटात ही बस 300 फूट दरीत कोसळून ३३ प्रवासी दगावले आणि एकजण वाचले आहेत. काही क्षणांतच काळाने घाला घालून विकेंडचा शनिवारीच दी एण्ड केला. पोलादपूरला ९.३० वाजता ३4 जणांनी फोटो काढून सहलीच्या आनंदाची झलक दाखवली. त्यानंतर १०.३० वाजता भीषण अपघात झाला. काही वर्षांपूर्वी झी नेटवर्कचे झैदी यांची कारही याच ठिकाणाहून दरीत कोसळून ७ जण मृत्यूमुखी पडले होते. याच ठिकाणी संरक्षक कठडा उभारण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, पोलादपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल कधीच घेतली नाही.

चालकाचा क्षणीक मोह आणि काळाला आमंत्रण 

घाटात बस असताना बसमध्ये सहलीच्या आनंदात गाणी गात धमालमस्ती सुरू होती. त्याच वेळी बसचे चालक प्रशांत भांबेड यांनाही बस चालवत असताना बसमध्ये रंगलेला आनंद पाहण्याचा क्षणीक मोह झाला आणि त्यांनी नकळत मागे मान वळवली, हा क्षण काळाचा घाला घालणारा धोक्याचा ठरला. बस रस्त्याकडेच्या चिखलावर गेली त्यावेळी चालकाने तातडीने ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निसरडा भाग आणि चिखलामुळे गाडी थांबली नाही आणि थेट दरीत कोसळली.

- Advertisement -

‘त्या’ चार तासांत काय घडलं ?

  • चौथा शनिवार आणि रविवार म्हणून कोकण कृषी विद्यापीठाचे ४० जण महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते.
     
  • बसमध्ये सीट्स कमी असल्यामुळे ४० ऐवजी ३4 जणांना घेऊन ही बस ६.३० वाजता दापोलीवरून महाबळेश्वरच्या दिशेने निघाली.
  •  कोकण कृषी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेण्यात आली होती.
  •  निघालेली ही खासगी बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोलादपूर-आंबेनळी घाटातून जात होती.
  •  निघालेली ही बस डाव्या बाजुने रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावरुन खोल दरीत कलंडली.
  •  कळायच्या आतच ही बस 300 फूट खोल दरीत कोसळली.
  •  घडला ते ठिकाण अवघड वळणाचे किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हते.
  •  दरीत कोसळत असताना, त्याच बसमध्ये प्रवास करत असलेले प्रकाश सावंत-देसाई हे बसमधून बाहेर फेकले गेले.
  •  जिथे पडले तिथून बस खूप खाली कोसळली होती.
     
  • येताच हाताला लागेल त्याचा आधार घेत प्रकाश सावंत सुखरूप वर आले.
     
  • येताच त्यांनी जवळ असलेल्या त्यांच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. रेंज नसल्यामुळे त्यांचा कुणाशीच संपर्क होऊ शकला नाही.

‘फांदी तुटली असती तर 
मीही वाचलो नसतो’

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बस दरीत कोसळल्यानंतर मी एका झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असती तर मी सुद्धा खोल दरीत पडलो असतो. हातात येईल त्या झाडाला पकडून अंदाज घेत कसाबसा वर आलो. बस कोसळल्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून काही तरुण वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि ते मुंबईला निघून गेले. माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता. त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. 

- Advertisement -

संरक्षक कठडा नसल्यामुळे भीषणता वाढली 

त्याचवेळेस बस दरीत कोसळल्याने झालेला मोठा आवाज ऐकून जवळच्याच धबधब्यावर सहलीसाठी आलेले युवक वर रस्त्यावर धावत आले. घडला प्रकार समजताच त्या युवकांपैकी एका युवकाने रेंज असलेला त्याचा मोबाईल प्रकाश सावंत यांना दिला आणि ते सर्वजण मुंबईच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर प्रकाश सावंत यांनी फोन नंबर लक्षात असल्याने त्यांचा एक मित्र अजित आणि दापोली पोलिसांना यांना घटनेची माहिती दिली.प्रकाश सावंत यांचे मित्र अजित आणि दापोली पोलिसांनी तात्काळ या घटनेची वार्ता सगळीकडे पोहोचवली. माहीती मिळताच दापोली पोलिस आणि पुण्याहून एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. 300 फूट दरीत कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला असून, प्रकाश सावंत वगळता सहलीला निघालेल्या या बसमधील इतर ३३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे बचाव पथकाच्या अधिकार्‍यानेस्पष्ट केले आहे.

सहलीच्या आनंदात काढलेला फोटो ठरला शेवटचा

दापोलीवरून ही बस अंदाजे ८ वाजता निघाली होती. पोलादपूरमध्ये साडेनऊच्या सुमारास बसमधल्या प्रवाशांनी आनंदात फोटो काढले. त्याआधी एका ठिकाणी थांबून चहा नाश्ता केला. मात्र पुढे काळ आपली वाट पाहात आहे याची कल्पना बसमध्ये सहलीचा आनंद करणार्‍यांना नव्हती.

बचावकार्य सुरू

बसमधील प्रवाशांची यादी ही संबंधित विद्यापीठातील जुजबी माहितीवर आधारलेली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रवाशांना दरीतून काढण्याचे आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नेमके किती प्रवासी बस मध्ये होते. त्यातले किती दगावले आणि किती बचावले हे बचावकार्य पूर्ण झाल्यावर स्पष्ट होणार आहे.

सहा महिन्यापूर्वीच रोशनचे लग्न

दापोली – दापोलीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हर्णे गावातील रोशन तबीब, किशोर चौगुले व जयेंद्र चौगुले असे तीन जण या अपघातग्रस्त बसमध्ये होते. हे तिघेही दापोली कृषी विद्यापीठात नोकरीला होते. रोशन तबीब याचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. रोशनची बहीण रेश्मा ही देखील दापोली कृषी विद्यापीठात नोकरी करते. मात्र, ती या सहलीला गेली नव्हती. किशोर चौगुले यांचे वडील पी. एन. चौगुले हे हर्णेमधल्या पाज फिशिंग सोसायाटीचे माजी अध्यक्ष आहेत. या भीषण अपघातामुळे हर्णै परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांच्या वारसांना ४ लाखाची मदत जाहीर 

पोलादपूर बस अपघातातील मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अपघातातील जखमींवरील उपचारांचा पूर्ण सरकारतर्फे करण्यात येईल. या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेबद्दल ऐकून खूप वाईट वाटले.  मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की त्यांनी त्या विभागात असलेल्या सर्व जखमी तसेच मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे साहाय्य करावे.
– राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झालेल्या बस अपघाताचे वृत्त ऐकून फार दुःख झाले.अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मदतकार्य सुरु आहे.शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत.जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.
– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

महाबळेश्वर येथे झालेल्या दुर्घटनेबाबत ऐकून खूप वाईट वाटले. स्थानिक प्रशासन योग्य प्रकारे मदत कार्य करत आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावे आणि   मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रति मी माझी सहानभूती व्यक्त करतो.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -