उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., नक्कल करत राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटाध्यक्ष मेळावा कार्यक्रमात बोलताना जोरदार फटकेबाजी केली. नरेंद्र मोदींनी गुजरात-गुजरात करू नये. या देशातील प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे. प्रत्येक राज्याकडे तुम्ही समान नजरेने बघणं गरजेचं आहे. हीच आपली धारणा होती, आहे आणि राहील. या उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं. कोश्यारींचं वय काय बोलतात काय?, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टीका केली.

राज्यपाल पदावर बसलेत म्हणून त्यांचा मी मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. कोश्यारी तुम्ही गुजराती-मारवाडी या समाजाला पहिल्यांदा विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?, तुम्ही उद्योगपती आणि व्यापारी आहात तर तुम्ही तुमच्या राज्यात का व्यापार केला नाहीत?, याचं कारण म्हणजे उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्र मोठाच होता आणि मोठाच आहे. हा देश नव्हता त्यावेळी या भागाला हिंद प्रांत म्हणत होते. या हिंद प्रांतावर अनेक आक्रमण झाली, यामध्ये मोगल, पोर्तुगीज आणि ब्रिटीश आले. परंतु या हिंद प्रांतावरती जर सव्वाशे वर्ष खऱ्या अर्थाने कुणी राज्य केलं असेल तर ते आमच्या मराठेशाहींनी केलं. महाराष्ट्र समृद्ध होता. महाराष्ट्र काय आहे तो आम्हाला कोश्यारींकडून ऐकायचं नाहीये. गुजराती, मारवाड्यांना पुन्हा आपल्या राज्यात जायला सांगितलं तर ते जातील का?, आजही परदेशातील कोणताही प्रकल्प देशात आणायचा असेल तर त्याची पहिली पसंती महाराष्ट्र असते. कारण त्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटण्याची असते, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. हे नक्की काय चाललंय तेच मला कळत नाही. उद्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर झाले तर त्यांनी पहिली पाच वर्ष उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या फक्त तीन राज्यांवर लक्ष केंद्रीत करावं आणि तिथे उद्योगधंदे आणावेत, असं मी २०१४ च्या भाषणात देखील बोललो होतो. परंतु त्या राज्यातील लोकं घरं-दारं सोडून दुसऱ्या राज्यात जाताहेत त्याचा दुसऱ्या राज्यांना त्रास होत आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत त्याचं वाईट वाटत नाहीये. हे प्रकल्प कोणत्याही राज्यात जाऊदेत. ज्या राज्यांमध्ये उद्योगधंद्यांचा मागासलेपणा आहे, त्या राज्यांत प्रकल्प गेले पाहीजेत. तेथील तरूण-तरुणींना रोजगार मिळाला पाहीजे. त्यामध्ये काहीच वाईट वाटण्यासारखं नाहीये. भारतातलं प्रत्येक राज्य जर मोठं झालं आणि येथील तरुण-तरुणींना रोजगार मिळाला तर प्रत्येक राज्यासंह देश सुद्धा प्रगत होईल, असं राज ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?, राज ठाकरेंचा