घरमहाराष्ट्रNisarg Cyclone - चर्चा खूप झाली, पण वादळ मुंबईत आलं का नाही?...

Nisarg Cyclone – चर्चा खूप झाली, पण वादळ मुंबईत आलं का नाही? वाचा!

Subscribe

कोरोनाच्या संकटाचा निकराने सामना करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राला बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. कोकणातल्या रायगड, काही प्रमाणात रत्नागिरी आणि सर्वाधिक अलिबाग या भागांना वादळाचा मोठा तडाखा बसला. मंगळवारी दुपारपर्यंत अलिबागला वादळ धडकणार असा अंदाज असताना बुधवारी ऐन वेळी मात्र वादळ मुरूडवर येऊन आदळलं. कोकणात किनारी भागात वादळामुळे मोठं नुकसान झालेलं असतानाच हे वादळ मुंबईच्या दिशेनं येणार असून काही तासांमध्ये मुंबईत देखील शिरेल असं बोललं जात होतं. पण वादळ मुंबईत आलंच नाही. त्यावरून अनेकांनी हवामान विभाग, प्रसार माध्यमं आणि प्रशासकीय यंत्रणा यांची मस्करी केली असताना आता हवामान विभागानेच वादळ मुंबईत का आलं नाही? याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

वादळानं अचानक रस्ता बदलला!

कोरोनाच्या संकटाशी झगडा करत असलेल्या मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचं संकट समोर उभं ठाकलेलं पाहून धडकी भरली होती. चक्रीवादळ कोकणात मुरूड, अलिबाग, रत्नागिरी, दिवे आगार, हरिहरेश्वर या भागांमध्ये सोसाट्याचा प्रचंड वेगवान वारा आणि मुसळधार पाऊस या रुपात कोसळत असताना मुंबईत प्रशासकीय यंत्रणा शक्य ते सर्व प्रयत्न करत होती. मुंबईच्या किनारी भागातही वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. संपूर्ण मुंबईत दीडशेच्या आसपास झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वादळ मुंबईत कधी येणार याचं काऊंटडाऊन मुंबईकरांनी सुरू केलं होतं. पण मुरूड, अलिबागवरून पुढे येताना वादळानं अचानक रस्ता बदलला!

- Advertisement -

अलिबागऐवजी दक्षिणेला मुरूडजवळ धडकलं!

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वादळ जेव्हा समुद्रात असतं, तेव्हा त्याला कोणताही अवरोध नसतो. त्यामुळे त्याचा वेग आणि पर्यायाने जोर खूप जास्त असतो. ते एकाच दिशेने प्रवास करू शकतं. पण जमिनीवर धडकल्यानंतर मात्र त्याला अवरोध निर्माण होतो. बांधकामं, झाडं आणि जमिनीवरून येणारे वारे यामुळे वादळाला अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शिवाय खाली पाण्याऐवजी जमीन असल्यामुळे वादळाला प्रबळ आधार मिळत नाही. त्यामुळे वादळाची तीव्रता कमी होते. त्याचा वेग मंदावतो आणि पर्यायाने ज्या दिशेला सहज वळता येईल, तिथे त्याचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीलाच चक्रीवादळ अलिबागऐवजी काहीसं दक्षिणेकडे मुरूडला धडकलं. त्यामुळे अलिबाग आणि रायगडमध्ये जोर लावल्यानंतर थोडं कमकुवत झालेलं निसर्ग चक्रीवादळ दिशा बदलून मुंबईला न येता पनवेल, खोपोलीमार्गे इशान्य दिशेने उत्तर भारताकडे सरकलं. त्यामुळे मुंबईत अपेक्षेपेक्षा खूप कमी नुकसान झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -