घर महाराष्ट्र बंडखोर शिंदे गटाने हे पाच प्रश्न ठेवले अनुत्तरित

बंडखोर शिंदे गटाने हे पाच प्रश्न ठेवले अनुत्तरित

Subscribe

बंडखोर शिंदे गटाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांबाबत आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली. ही पत्रकार परिषद आमदार दिपक केसरकर यांनी घेतली. मात्र, महत्त्वाच्या 5 प्रश्नांची उत्तरे शिंदे गटाने दिली नाहीत.

1) एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार महाराष्ट्रत कधी येणार?

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीनंतर  शिंदे गट रातोरात गायब झाल होता. हा गट मतदार संघात कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनीही हाराष्ट्रात आल्यावर शिंदे गटाची ताकद कमी होईल, असे भाकित केले होते. त्यामुळे गुवाहटीतून शक्तीप्रदर्शन करणारा शिंदे गट महाराष्ट्रात कधी येणार या  प्रश्नाचे उत्तर  पत्रकार परिषदेत मिळाले नाही.

2) उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत की नाहीत?

- Advertisement -

आम्ही म्हणजेच शिवसेना असे शिंदे गट म्हणतोय. एकनाथ शिंदे हे गटनेते आहेत असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व त्यांनी अद्याप झिडकारलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिंदे गटाचे नेते आहेत की नाहीत, याबाबतही स्पष्टीकरण त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेले नाही.

3) बंडामागे भाजपा आहे का?

महाराष्ट्रातून गुजरात आणि गुजरातहून आसामध्ये गेलेल्या शिंदे गटाच्या बंडावर एकच प्रश्न विचारण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या बंडामागे नेमकी कुणाची मदत आहे. भाजप तुम्हाला पाठबळ देतंय का? यावर आतापर्यंत शिंदे गटाने स्पष्टपणे भाजपचे नाव घेतलेले नाही. एक राष्ट्रीय पक्ष, महाशक्ती अशा प्रकारची विशेषणे वापरली गेली आहेत.

4) तुम्ही नको हे उद्धव ठाकरेंना तोंडावर येऊन का सांगत नाही?

आम्ही शिवसेनेतून बाहेरही पडणार नाही, नवा पक्षही स्थापन करणार नाही किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात शामिल होणार नाहीत, अशी काहीशा विचित्र अटी बंडखोरांच्या शिंदे गटाने घातल्या आहेत. त्यामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना वारंवार सांगितले आहे की तुम्ही आमच्या समोर येऊन सांगा, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नकोय म्हणून… पण अद्याप शिंदे गटाने ही हिंमत केलेली नाही. आमच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचे पाठबळ असल्याचं सांगतात पण हेच उद्धव ठाकरेंसमोर महाराष्ट्रात येऊन का सांगत नाहीत, किंवा एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत, असे थेट उद्धव ठाकरेंसमोर हे का सांगत नाहीत, या प्रश्नाचे ही उत्तर या गटाने दिलेले नाही.

5) हे कधी संपणार?

मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेले हे सत्ता नाट्य आणखी किती दिवस चालणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गुवाहटीत थांबलेल्या आमदारांच्या बैठकीनंतर स्पष्ट निर्णय, भूमिका घेतल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, आजच्या बैठकीनंतरही शिंदे गट पुढे काय करणार, याची स्पष्टता नाही, या ही प्रश्नाचे उत्तर शिंदे गटाने दिलेले नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -