घरमहाराष्ट्ररामदास आठवले शिवसेनेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार

रामदास आठवले शिवसेनेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार

Subscribe

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. सध्या शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांच्या दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. राज्यात स्वतःचा हक्काचा सुरक्षित लोकसभा मतदारसंघ असला पाहिजे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बांद्रा पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची रामदास आठवलेंनी घोषणा करून स्थानिक कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश या बैठकीत दिले आहेत.

रिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या स्थापनादिनानिमित येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात महामेळावा आयोजित करून रिपाइं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी सांगितले. त्याच्या पूर्वतयारीसाठी रामदास आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली होती. आठवले सध्या महाराष्ट्रतून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत आठवले २००९ मध्ये पराभूत झाले होते.

- Advertisement -

१९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. त्यावेळी रामदास आठवले हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मदारसंघ हा रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चेंबूर, अनुशक्तीनगर, धारावी, नायगाव आणि वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असणारे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ सुरक्षित मतदारसंघ असल्यानेच रामदास आठवले या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

रामदास आठवलेना आमच्या शुभेच्छा – खासदार राहुल शेवाळे

रामदास आठवले यांनी लोकसभेची उमेदवारी दक्षिण मध्य मुबंईतून घोषित केली आहे. आठवलेच्या उमेदवारी नंतर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी रामदास आठवले यांचे आव्हान स्वीकारले आहे. उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झालेला आहे. आमची ताकद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर कळेल. रामदास आठवले यांना आमच्या शुभेच्छा, अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी रामदास आठवले यांच्या उमेदवारीवर सावध प्रतिक्रिया दिली. दलित, मुस्लिम आणि गुजराती बहुल असणाऱ्या मतदारसंघात शिवसेनेला रामदास आठवलेची उमेदवारी डोकेदुखी ठरते का हे पाहणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -