घरताज्या घडामोडीपवार काका - पुतण्यांची पुण्यात बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर गुप्त भेट; चर्चा मात्र...

पवार काका – पुतण्यांची पुण्यात बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर गुप्त भेट; चर्चा मात्र गुलदस्त्यात

Subscribe

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यांची पुण्यातील एका बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर भेट झाल्याची माहिती आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतरची ही पवारांसोबतची चौथी भेट आहे. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

चांदणी चौक पुल लोकार्पणासाठी आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्यात होते. त्यासोबतच वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील पुण्यात होते. यामुळे पुण्यात मोठया राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे होती. ती अखेर खरी ठरली आहेत. एका बड्या उद्योगपतीच्या घरी पवार – काका पुतण्याची गुप्त बैठक झाली आहे.

- Advertisement -

अजित पवार आज चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पुण्यात होते. हा सोहळा संपल्यानंतर त्यांचा ताफा शासकीय विश्रामगृहावर गेला. तेथून अजित पवार खासगी वाहनाने (एमएच १२ ओएम ८१८१) पुण्यातील कोरेगाव पार्क येथे गेले. कोरेगाव पार्क येथील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगला क्रमांक ७३ येथे त्यांनी काका शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर प्रथम शरद पवारांचा ताफा कोरेगाव पार्कमधून बाहेर पडला, त्यानंतर अजित पवार तेथून निघाले. ते एवढे घाईत होते, की बंगल्याच्या गेटला त्यांची कार धडकली.

शुगर इन्स्टिट्यूटची बैठक अर्धवट सोडून पवार निघाले…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी पुण्यात आलेले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठक अर्धवट सोडून ही भेट घेतली आहे. शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे हे बैठकीसाठी उपस्थित होते. शरद पवार हे बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटील देखील बाहेर निघाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर राजेश टोपे देखील त्यांच्या मागोमाग निघाले. तेव्हा या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार, जयंत पाटील शूगर इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले तर राजेश टोपे यांनी पुन्हा बैठकीत सहभाग घेतला.

- Advertisement -

याआधीही उद्योजकाच्याच घरी बैठक

पुण्यातील बैठकचे वृत्त अद्यापपर्यंत दोन्ही पवारांकडून फेटाळण्यात आलेले नाही. त्यासोबतच त्यावर काहीही भाष्य त्यांनी केलेले नाही. याआधीही पवार काका-पुतण्यांची मुंबईत एका मोठ्या उद्योगपतीच्या बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. मात्र अद्याप दोन्ही गटांकडून कोणाकडे किती आमदार याची स्पष्टता करण्यात आलेले नाही. तसेच विधिमंडळाचे अधिवेशन संपले तरीही दोन्ही गटांकडून व्हीप देखील जारी करण्यात आला नाही. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. तिथे शरद पवार गटाच्या तीन खासदारांनी सभात्याग केला तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे सभागृहातच बसून होते. मात्र दोन्ही गटांकडून कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके काय चालले आहे, याचा संभ्रम कायम आहे.

अजित पवार यांनी २ जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला आहे. तर शरद पवार हे मीच राष्ट्रवादीचा आश्वसक चेहरा आणि अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत. साधारण दीड महिन्यांपासून हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येण्याचे टाळत आहेत. पुण्यात नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी पवार काका, पुतणे मंचावर उपस्थित होते, मात्र त्यावेळीही अजित पवारांनी काकांसमोर येणे टाळले होते.

अजित पवारांच्या बंडानंतर पवारांची बारामतीकडे पाठ

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राज्यासाठी देशासाठी मोठे नेते असले तरी बारामती हे त्यांचे मुळ आहे. येथे प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेणे. प्रत्येक घरातील व्यक्तींची त्यांना माहिती आहे. हे तिन्ही नेते कुठेही असले तरी किमान १५ दिवसांतून बारामतीमध्ये येत असतात. मात्र अजित पवारांच्या बंडानंतर काका पुतणे आणि सुप्रिया सुळे देखील बारामतीमध्ये आलेल्या नाही. येथील कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाईल हिच त्यांना भीती असल्याचे सांगितले जाते.

सिल्व्हर ओक आणि वायबी सेंटरला भेट

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांनी शरद पवारांची भेट टाळली आहे. असे असले तरी १४ जुलैला पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हल ओक येथे अजित पवार गेले होते. काकी प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानही या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. अजित पवारांनी त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आठ मंत्र्यांसह मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटर येथेही शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांनी सत्तेत सहभागी व्हावे. भाजप प्रणित लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यासाठी ही भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -