घरCORONA UPDATEनिसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीबाबत शरद पवार मोदींना भेटणार

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीबाबत शरद पवार मोदींना भेटणार

Subscribe

बैठकीत येत्‍या चार ते पाच दिवसांत चक्रीवादळग्रस्‍तांना अधिकच्या पॅकेजची घोषणे बाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात कोरोनाचे संकट असतानाच नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नुकसान केले आहे. हे नुकसान बघता गरज पडल्यास शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरूवारी महत्‍वाची बैठक झाली. निसर्ग चक्रीवादळग्रस्‍त कोकणवासियांना आणखीन काय मदत करता येऊ शकते याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत येत्‍या चार ते पाच दिवसांत चक्रीवादळग्रस्‍तांना अधिकच्या पॅकेजची घोषणे बाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान वादळामुळे मोठ्या प्रमाणात लाईटचे खांब पडले असून, विद्युत पुरवठा युदधपातळीवर सुरू करण्यात यावा अशी सूचनाही शरद पवार यांनी केली आहे. गुरुवारी दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्‍मारकात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेउन चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, उदय सामंत देखील उपस्‍थित होते. शरद पवार यांनी कोकण दौऱ्यात चक्रीवादळाने झालेल्‍या नुकसानीची पाहणी केली आहे. त्‍यावर आणखीन मदतीसाठी काय करता येईल याची त्‍यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

नुकसानग्रस्‍त भागातील ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पंचनामे पूर्ण झाले आहेत. १०० कोटींची मदत ही केवळ तातडीची मदत होती. ती काही अंतिम मदत नाही. मदतीसाठी अजूनही काही निर्णयांची आवश्यकता आहे. त्‍याबाबतच आज चर्चा झाली. येत्‍या चार ते पाच दिवसांत त्‍याबाबत अधिक माहिती मिळेल. पंचनामे हे वस्‍तुस्‍थितीवर आधारित व्हावेत. मुल्‍यांकन करताना झाडांचेही मुल्‍यांकन व्हावे. कोरोनामुळे गेल्‍या तीन महिन्यात कोकणातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे.पर्यटन, मासेमारीसह स्‍थानिक छोटे मोठे व्यवसाय यांचे पुनरूज्‍जिवन कसे करता येईल यावर चर्चा झाली. वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. तो युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात यावा. त्‍यासाठी आजूबाजूच्या जिल्‍हयातून पथके पाठविण्यात यावी. जेणेकरून पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू करता येतील अशी देखील सूचना शरद पवार यांनी केली आहे. पंचनामे होउन आढाव्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर जेव्हा नुकसानीचा संपूर्ण अंदाज येईल तेव्हा केंद्राच्या मदतीसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ असेही शरद पवार यांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -