घरमहाराष्ट्रडॅमेज कंट्रोलसाठी पवार मैदानात

डॅमेज कंट्रोलसाठी पवार मैदानात

Subscribe

सोमवारपासून महाराष्ट्र दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसची मेगा गळती रोखण्यासाठी शरद पवार १७ सप्टेंबरपासून राज्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. यावेळी राज्यभर फिरून शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांशी संवाद साधून पक्षातील मरगळ, निराशा हटवण्याचे काम करणार आहेत. गळतीने हैराण झालेल्या राष्ट्रवादीमध्ये सोबतच विधानसभेच्या तयारीसाठी नवे प्राण फुंकण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील या दौर्‍याची सुरुवात सोलापूरमधून होणार आहे. भाजप-सेनेच्या दिशेने निघालेल्या पक्षातील जिल्हा, तालुका आणि प्रत्येक फळीतील नेत्यांशी संवाद साधून त्यांना रोखण्यासाठी पवार राज्यात दौरा करणार आहेत. राज्यभर फिरून पक्ष पदाधिकार्‍यांमध्ये विश्वास पेरण्याचे पवारांनी ठरवले आहे. या दौर्‍याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकाची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांतील कार्यकर्ते आणि नेत्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून शरद पवार यांना पक्षांतर्गत राजकारणामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणण्याची सुरुवात याच मतदारसंघातून पवार करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -