घरमहाराष्ट्रशिवसेनेलाही भुजबळांची गरज

शिवसेनेलाही भुजबळांची गरज

Subscribe

फायरब्रँण्ड, मास लीडर आणि ओबीसी चेहरा,दुसर्‍या फळीतील नेत्यांचा भुजबळांना विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही, ‘योग्य वेळी उत्तर देऊ. वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल,’ असे म्हटल्याने भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत मातोश्री गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला बळकटी मिळते, मात्र या चर्चांमुळे नाशिक शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

आज जेवढी भुजबळांना शिवसेनेची गरज आहे, तेवढीच शिवसेनेलाही त्यांची गरज आहे. भुजबळ यांच्यासारखा मास लीडर, फायरब्रॅन्ड, मुलुखमैदान तोफ शिवसेनेच्या ताफ्यात आल्यास पक्षालाही त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे सध्या शिवसेनेने वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत याबाबत चर्चा झाल्याचे कळते. त्यामुळे येत्या काही दिवसांत भुजबळ यांचा पुत्र पंकज आणि पुतण्या समीर यांच्यासह स्वगृही परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकच्या शिवसैनिकांसह शिवसेनेच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

- Advertisement -

भुजबळ हे शिवसेनेतील पहिले बंडखोर नेते आहेत. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याची हिंमत दाखवली होती. यामुळे शिवसैनिकांचा अजूनही भुजबळांवर राग आहे. स्थानिक पातळीवर या संघर्षाची धार अधिक तीव्र आहे. तसेच आजही शिवसेनेच्या उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊतआणि अन्य महिला शिवसैनिकांवर भुजबळ यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयात केसेस सुरू आहेत.असे असले तरी भुजबळांसारखा ओबीसी चेहरा, मुलुख मैदान तोफ आणि राज्याचे राजकारण कोळून प्यायलेला नेता सध्या तरी शिवसेनेत नाही, असे मत एका संपर्कप्रमुख नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले.

भुजबळांच्या मनातही राष्ट्रवादीकडून आपल्याला फार महत्त्व दिले जात नाही आणिआपल्या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे आपल्या आणि कुटुंबियांच्या मागे राहिली नाही, याची खंत वेळोवेळी खासगीत बोलून दाखवली आहे. तसेच सध्या ते मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात जामिनावर असल्याने शिवसेनेत गेल्यास मित्रपक्ष भाजपकडून त्यांना मदत होईल, अशी भावना भुजबळांची असल्याचे भुजबळ समर्थक सांगतात. भविष्यातील राजकारणाची नांदी पाहता भुजबळ स्वगृही परतल्यावर शिवसेनेला त्याचा उपयोगच होईल, असे मुंबईतील एका उपनेत्याने सांगितले. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला दुसर्‍या फळीतील नेते विरोध करीत असून त्यांच्यामुळेच भुजबळांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे योग्यवेळी निर्णय घेतील, असा विश्वासही या उपनेत्याने बोलून दाखवला.

- Advertisement -

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापले असून भाजप आणि शिवसेनेत इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भुजबळ यांचा येवला मतदारसंघ आणि पुत्र पंकज याचा नांदगाव मतदार संघ सुरक्षित ठेवण्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील काही समर्थक आमदार यांना सोबत घेऊन लवकरच पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. भुजबळ शिवसेनेत गेल्यास नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडेल. तसेच जर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर राज्यातील राजकारणात मोठे बदल होतील व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार बबनराव घोलप, राज्यमंत्री दादा भुसे यांनी मात्र भुजबळांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला आहे.

भुजबळांच्या विरोधात नाशिकमध्ये बॅनरबाजी
भुजबळांना शिवसेनेतून कडाडून विरोध होत आहे. नाशिकमधील काही शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला. तर ‘भुजबळ यांनी आहेत तिथेच राहावं. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही, असेही बॅनरवर नमूद करण्यात आले होते. याशिवाय आपण आहे तिथेच राहा, असा मजकूर लिहून रवींद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

मी शिवसेनेत जाणार ही निव्वळ अफवा- भुजबळ
भुजबळ शिवसेनेत जाणार या वृत्ताचा खुद्द भुजबळ यांनी इन्कार केला आहे. आपण शिवबंधन बांधून घेणार नसून आपल्या मनगटावर घड्याळच राहील, असे सांगत शिवसेना प्रवेशाची चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचे भुजबळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -