घरमहाराष्ट्रAmravati Lok Sabha : नवनीत राणांना कोणाच्या जीवावर उमेदवारी दिली? शिवसेनेचे आनंदराव...

Amravati Lok Sabha : नवनीत राणांना कोणाच्या जीवावर उमेदवारी दिली? शिवसेनेचे आनंदराव अडसूळ संतापले

Subscribe

कोणाच्याही विरोधाला न जुमानता भाजपाने राणांना उमेदवारी दिल्याने शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ संतापले आहेत. राणा यांना नेमकी कोणाच्या जीवावर उमेदवारी देण्यात आली, असा प्रश्न अडसूळ यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

अमरावती : भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे महायुतीत मात्र, वादाची ठिणगी पडली आहे. कारण राणा यांच्या उमेदवारीला महायुतीत शिवसेना आणि प्रहार संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. परंतु, या विरोधाला न जुमानता भाजपाने राणा यांच्या नावाची घोषणा केल्याने शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ संतापले आहेत. राणा यांना नेमकी कोणाच्या जीवावर उमेदवारी देण्यात आली, असा प्रश्न अडसूळ यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. (Shiv Sena leader Anandrao Adsul was furious after BJP announced candidature of Navneet Rana)

हेही वाचा… Navneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, नवनीत राणांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे मानले आभार

- Advertisement -

नवनीत राणा यांना भाजपाकडून अमरावती लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता महायुतीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राणांच्या उमेदवारीबाबत बोलताना अडसूळांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, भाजपाने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी ही राजकीय आत्महत्या आहे. महायुद्धात जापानने हाराकिरी केली. तेच भाजपने केले आहे. सर्व विरोधात असताना कशाच्या जीवावर नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली? बच्चू कडू नवनीत राणा यांच्या विरोधात आहे. पटेल विरोधात आहे. भाजपाचे पदाधिकार विरोधात आहे. त्यामुळे राणा यांना तिकीट देणे ही आत्महत्या ठरणार आहे, असे म्हणत अडसूळ यांनी संताप व्यक्त केला.

तसेच, बडनेरातून तरी नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल उपस्थित करत आनंदराव अडसूळ म्हणाले की, शिंदे गटाचा उमेदवार म्हणूनच मी उभा राहणार आहे. नवनीत राणा यांची उमदेवारी महायुतीने जाहीर केली नाही. भाजपाने हा उमेदवार जाहीर केला आहे, आम्ही नाही. अढळराव पाटील तिघांच्या संमतीने राष्ट्रवादीत गेले. तसे नवनीत राणांबाबत घडले नाही. मी साक्षीदार आहे. त्यामुळे अमरावतीतून मी माझ्या मुलाला उभे करणार नाही. मीच उभा राहील, असेही अडसूळ यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

आनंदराव अडसूळ आमचा प्रचार करतील, असा दावा काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी केला होता. त्यावरही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते निर्लज्ज आहेत. ते कोणतेही वक्तव्य करतात. आम्ही लाज, शरम सोडलेली नाही. आम्ही स्वाभिमान विकला नाही. आम्ही आहोत तिथे आहोत. आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढू शकतो आणि लढणार. त्यामुळे अमरावतीतून उमेदवार इतर कोणताही उमेदवार न देता मी स्वत: उभा राहणार आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तर, भाजपाने माझ्या नावाचा विचार केला नाही. त्यांना कमळावर लढणारी व्यक्ती हवी होती. त्याला मी काय करणार? मला भाजपाकडून ऑफर आली तर मी जाईल. अजूनही ऑफर आली तरी मी भाजपामध्ये जाईल, असे अडसूळांकडून सांगण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याबाबतही विविध चर्चा रंगल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -