घरताज्या घडामोडीबाळासाहेबांनी काश्मिरी पंडितांसाठी जे केलं ते कोणीच केलं नाही, संजय राऊतांचा भाजपवर...

बाळासाहेबांनी काश्मिरी पंडितांसाठी जे केलं ते कोणीच केलं नाही, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Subscribe

राज्यात काश्मीर फाईल्स चित्रपटाला करमुक्त करावे अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचे दिसत आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर मोदी सरकारने बोलावे त्यांच्या घरवापसीबाबत सांगावे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काश्मिर फाईल्सवरुन राजकारण करु नये. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही केले ते कोणीच केले नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राजकारण करणं थांबवावे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटाला करमुक्त करण्यात यावे यासाठी विरोधक मागणी करत असल्याचा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले, त्यांना काश्मीर आता दिसत आहे. काश्मीर फाईल्स सिनेमा आल्यावर त्यांना आता काश्मीर दिसत आहे. गेले ३२ वर्ष हे लोक कुठे होते. काश्मीर हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्या विषयाचे राजकारण न करता लोकांनी मोदींना यासाठी मतदान केले होते की, भाजपने असे सांगितले होते पाकव्याप्त काश्मीरला भारतात आणून अखंड हिंदुस्तान निर्माण करु अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली आहे.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने काश्मीरी पंडितांची बाजू घेतली

काश्मीरच्या काही घटनांवर आधारित चित्रपट आला आहे. तो चित्रपट कोणाचा पॉलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने काश्मिरी पंडितांची बाजू घेऊन काश्मीरविषयी परखड भूमिका स्पष्ट केली होती. बाळासाहेब ठाकरे असे एकमेव नेते होते की, ज्यांनी सांगितले होते काश्मिरी पंडितांना स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र द्या, ते स्वतःचे रक्षण करतील. तेव्हा त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य केले म्हणून विरोध करणारे भाजपचे केंद्रातील नेते होते. बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते ज्यांनी अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या अतिरेक्यांना सांगितले जर अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तरी तुमची हजला जाणारी विमाने उडू देणार नाही. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली. त्यामुळे काश्मीर फाईल्सची कागदपत्रे फडफडवून दाखवू नका आम्हाला माहिती आहे. काश्मिरी पंडितांच्या मुलांना मेडिकलमध्ये ५ टक्के आरक्षण देणारे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यासाठी आम्ही सिनेमा नाही केला, राजकारण नाही केले. तेव्हा कोणत्या विषयाचे राजकारण करायचे आणि नाही याचे भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे.

आम्ही ठाकरे चित्रपटाला करमुक्त केले नाही

आम्ही ठाकरे चित्रपट केला होता त्यालासुद्धा आम्ही करमुक्त केले नव्हते. त्यासाठी आम्ही मागणी केली नाही की, करमुक्त करा लोक येतात आणि पाहतात, काश्मीर फाईल्सवरुन जे राजकारण सुरु आहे ते बरोबर नाही. काश्मीरच्याबाबत शिवसेनेची भावना आणि संवेदना काश्मिरी पंडित जाणतात असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

काश्मीरी पंडितांची घरवापसी कधी होणार?

खर म्हणजे वकील मी नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत.त्यानी नागपूरच्या कोर्टात वकिली केली आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही फक्त पक्षाचे मत मांडतो कोणाची वकिली करत नाही. भूतकाळात काय घडलं हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सत्य पचत नसेल तर नाईलाज आहे. आम्ही अनेकदा काश्मीरला जाऊन आलो आहोत. राजरकारणासाठी नाही तर अमन आणि शांतीसाठी, महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक काश्मीरी नेत्याला बोलवून त्याची चौकशी केली आहे. काश्मिरी मुलांना भेटलोय आणि भेटत असतो. फक्त पर्यटनासाठी गेलो नाही. लाल चौकातही जाऊन आलो आहेत ज्याचे राजकारण केले नाही. ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे आहे. त्यासाठी हे काश्मिरी फाईल्स आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जे केले ते या देशातील कोणत्या राज्याने केले नाही. त्यामुळे काश्मीरविषयी या लोकांनी न बोलले बरे, पंतप्रधानांनी २०१४ साली पाकव्याप्त काश्मीरला एकत्र करु असे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे. तसेच काश्मीरी पंडितांची घरवापसी कधी होणार? कधी घेऊन जाताय नुसते बोलताय कशाला, सिनेमा कशाला कारताय असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

विरोधक सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागतो आहे त्यांनी त्यांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सूचना घेतल्या पाहिजेत संपूर्ण देशात आजही कोरोनाची भीती कमी झाली नाही. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाला आहे. देशातील अनेक राज्यात आणि केंद्रानेही निर्बंधांचे पालन करा असे सूचवले आहे. महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात होळी साजरी करताना काही नियम आणि निर्बंध ठेवले असतील तर राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी विरोधी पक्षाने विरोध करु नये. पण विरोधासाठी विरोध करायचा लोकांचे प्राण धोक्यात घालायचे आणि राजकारण करायचे या मानसिकतेतून त्यांना बाहेर पडायचे नाही. एखाद्याला वैफल्या येऊ शकते सत्ता गेल्यामुळे किंवा सत्ता येत नसल्यामुळे पण ते वैफल्या इतक्या टोकाला जाऊ नये की, आपल्याच राज्यामध्ये आपल्या लोकांचे बळी जावे आणि त्याचे भविष्यात राजकारण करावे, सरकारला धारेवर धरावे हे पूर्णपणे चुकीचे आहे. इतकं क्रूरपद्धतीचं अमानूष राजकारण कोणी केले नाही आणि करु नये असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी, चर्चांना उधाण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -