घरमहाराष्ट्रपायी चालत निघालेल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले ठाणे पोलीस

पायी चालत निघालेल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले ठाणे पोलीस

Subscribe

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद झाल्यामुळे परप्रांतिय मजूर पायी आपल्या गावी चालत जात असताना 16 मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद येथे घडली. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांकडून पायी चालत जाणार्‍या मजुरांसाठी एसटी बसेसची सोय केली आहे. ठाणे, भिवंडी येथून रविवारी दुपारी सुमारे 30 एसटी बसेस शेकडो मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत. या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडणार आहे.

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी देखील टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने परप्रांतिय मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेक मजुरांनी आपल्या राज्यात परत जाण्यासाठी पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो मजूर आपल्या कुटुंबियांसह गावी पायी जात असल्याचे चित्र रस्त्यावर दिसत आहे.

- Advertisement -

पोलिसांनी राज्य परिवहन विभागाच्या मदतीने ठाण्यातून एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबईसह जवळपासच्या शहरातून पायी निघालेल्या मजुरांना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी एकत्रित करून 25 मजुरांचा ग्रुप तयार केला. त्यानंतर त्यांना एसटी बसेसमधून राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आमच्या हद्दीतून 3 बसेस रविवारी दुपारी सोडल्या असून बसेसमधून पाठवण्यात आलेल्या मजुरांची सर्व माहिती, त्यांचे नाव, पत्ते मोबाईल क्रमांक लिहून घेतले आहेत. तसेच त्यांना प्रवासात खाण्याचे पदार्थ देण्यात आलेले असून या मजुरांना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सीमा असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे सोडण्यात येईल.

- Advertisement -

तसेच भिवंडी येथून 20 बसेस सोडण्यात आलेल्या असून सुमारे 500 मजुरांना रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. ठाण्यातील तीन हात नाका येथून देखील काही बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. बसेस मधून रवाना करण्यात आलेले बहुतांश मजूर हे मुंबईतून पायी चालत निघाले होते, त्यांना एकत्रित करून त्यांची रवानगी बसेस मधून करण्यात आली असल्याचेही राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -