घरक्राइमSting Opration : ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’ बाजार समिती निवडणुकीत बाई,...

Sting Opration : ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’ बाजार समिती निवडणुकीत बाई, बाटली

Subscribe

नाशिक : शेतकर्‍यांच्या मुद्यांवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक गाजणे गरजेचे असताना नाशिक जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र ‘आपलं महानगर’च्या स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आले आहे. शहरालगत असलेल्या रिसॉर्टवर काही नेतेमंडळी शेकडो मतदारांना घेऊन व्हेज-नॉन्व्हेजवर यथेच्छ ताव मारतानाच कॉकटेल पार्ट्या रंगवतांना दिसत आहेत. त्यात ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’ वा ‘पाटलांचा बैलगाडा, त्यानं घाटात केलाय राडा’ या गितांवर बायका नाचवण्यापासून मसाज करणार्‍यांपर्यंतची सगळीच ‘व्यवस्था’ होत असल्याची धक्कादायक बाबही या स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली आहे. या ओल्या पार्ट्यांना निमंत्रण देणारे कोण आणि त्यात सहभागी होणारे कोण याची चौकशी जिल्हा प्रशासन करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

स्थानिक राजकारणाची भविष्यातील दिशा निश्चित करणार्‍या जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या २८ एप्रिलला होत आहेत. सुमारे वर्षभर लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीला मुहूर्त गवसल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. गावोगावी प्रचाराची राळ उडत आहे. शेतकर्‍यांना विविध प्रकारची आश्वासने देतानाच त्यांना प्रलोभने देण्याचेही प्रकार आता सुरु झाले आहे. नाशिक शहराजवळच्या एका रिसॉर्टमध्ये एका बाजार समितीशी संबंधित मतदारांची जोरदार पार्टी सुरु असल्याची बाब ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीला समजली. त्याची शहानिशा करायला प्रस्तुत प्रतिनिधी रिसॉर्टमध्ये गेला असता तेथे दारुचा उग्र वास पसरलेला होता. शिवाय सुमारे दोनशे लोकांच्या घोळक्यात काही महिला नृत्य करतांना आढळून आल्या. या महिलांबरोबर ताल धरतांना अनेकांचा तोल ढळत होता हे देखील ‘आपलं महानगर’च्या कॅमेर्‍यात बंदिस्त झाले आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीमुळे रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी दिसणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात रिसॉर्टमध्ये बाजार समितीच्या मतदारांशिवाय अन्य कुणीही आढळून आले नाही. म्हणजेच संपूर्ण रिसॉर्ट संबंधित मतदारांसाठीच बुक केल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

मतदारांना ‘माया’ लावल्याची चर्चा

एकीकडे ओल्या पार्ट्या रंगत असताना दुसरीकडे काही उमेदवार आणि नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘माया’ देखील लावली जात असल्याचे समजते. प्रत्येक मतदाराला २५ ते ३० हजारांचा भाव फुटला असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या वेळी असा घोडेबाजार अधिक उधळण्याची शक्यता असल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

काय आढळले आपलं महानगरच्या पाहणीत

  • नाशिक जवळच्या एका रिसॉर्टमध्ये सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास ओली पार्टी रंगली होती
  • सुमारे दोनशे लोकांच्या घोळक्यात काही महिला नृत्य करीत होत्या
  • मराठी गाण्यांच्या ठेक्यावर महिलांबरोबर काही पुरुषही ताल धरत होते
  • विशेष म्हणजे पार्टीत सहभागी असलेल्यांपैकी बहुसंख्य लोक रिसॉर्टमध्ये बर्‍याच दिवसांपासून मुक्कामी होते
  • परिसरात मसाज पार्लरमध्ये काम करणार्‍या तरुणीही फिरत होत्या
  • पेग पितांनाच शाकाहार व मांसाहारावर लोक ताव मारत होते
  • मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीही होत होती
  • परिसरातील स्विमींग टँकमध्येही दारु पिलेल्यांची गर्दी होती
  • मतदानाच्या दिवशीच आता आम्ही घरी जाणार असे काही मतदार सांगत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -