घरमहाराष्ट्रSupriya Sule : मंत्र्यांना नेमकी भीती कशाची? सुप्रिया सुळेंचा भुजबळांसह केसरकरांवर निशाणा

Supriya Sule : मंत्र्यांना नेमकी भीती कशाची? सुप्रिया सुळेंचा भुजबळांसह केसरकरांवर निशाणा

Subscribe

मुंबई : राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. तर, आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एका भावी शिक्षिकेला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची? असा सवाल करत दोघांवरही निशाणा साधला आहे.

हेही वाचा – “कॅबिनेट मंत्र्यालाच बाहेरचे व्यासपीठ लागतेय”, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोला

- Advertisement -

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र, ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर काल, रविवारी हिंगोली येथे ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मी कधी एक दगड मारला नाही, आंदोलन करताना कधी एक टायर जाळला नाही. तेच जाळत आहेत, तेच दगड मारत आहेत, त्यांनीच घरदारे जाळली, अख्खा बीड पेटवला. पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते, मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, असा जोरदार हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला होता.

मनोज जरांगे पाटील यांनी लगेचच भुजबळ यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले. आपण कधीच बीडमधील जाळपोळीचे समर्थन केले नाही, असे सांगतानाच, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला तेव्हा, भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणाचा फायदा आतापर्यंत लाटला आणि आता जोडण्याची भाषा करू नका. मराठा समाज तुमचे ऐकणार नाहीत, असेही त्यांनी सुनावले.

- Advertisement -

हेही वाचा – Recruitment : …तर क्वॉलिफायही करू शकत असाल, रोहित पवारांचा केसरकरांना बोचरा सवाल

तर, बीडमधीलच एका कार्यक्रमात दीपक केसरकर यांचे शिक्षक भरती प्रक्रियेवरून एका महिलेशी शाब्दिक चकमक उडाली होती. यावरून दीपक केसरकर संतप्त झाले. हा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, असे सांगतानाच त्यांनी, तुमचे नाव घेऊन डिस्क्वालिफाय करायला लावेन, असा इशाराही दिला.

यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळ आणि केसरकर यांना सुनावले आहे. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षक भरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिस्क्वॉलिफाय’ करण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो, असे त्यांनी म्हटले आहे. दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – एकेकाळचे कट्टर शत्रू, सध्याचे राजकीय मित्र; दीपक केसरकर चक्क नारायण राणे यांच्या घरी

एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहीर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात, असे त्यांनी भुजबळ यांचे प्रत्यक्ष नाव न घेता सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की, या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? असा सवाल करतानाच, त्यांच्या जे मनात आहे, तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -